आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिद्धिविनायक’ची शेतकऱ्यांच्या मुलींना मदत, मंदिर समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील सिद्धिविनायक न्यास (ट्रस्ट) विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचाही खर्च उचलण्याचे सिद्धिविनायक न्यासाने ठरवले आहे. याअंतर्गत  बुलडाणा येथील प्रियंका गवळी या मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी तीन लाख ३० हजार आणि चोपडा येथील राजेश्वरी चव्हाण या विद्यार्थिनीला १३ हजार ५२० रुपयांची मदत केली आहे, अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.  
 
बांदेकर यांनी सांगितले की, दुष्काळ आणि अन्य कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. त्यांनी पुढील शिक्षण घेऊन प्रगती करावी यासाठी सिद्धिविनायक न्यास त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. याशिवाय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत हवी असल्यास त्यांनी मदतीकरिता ऑनलाइन अर्ज करावेत, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
 
धनादेश लाटणारे रुग्णालय काळ्या यादीत : ते म्हणाले की, सिद्धिविनायक न्यासाकडे गरीब आणि गरजू रुग्ण  वैद्यकीय उपचाराकरिता आर्थिक मदत मिळावी म्हणून अर्ज करतात. या अर्जांचा आम्ही तीन दिवसांत निपटारा करतो. गरजू रुग्णांना उपचाराकरिता २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. परंतु काही रुग्णालये सिद्धिविनायक न्यासाकडून धनादेश (चेक) मिळण्यास उशीर झाल्यास रुग्णांकडून बिल वसूल करतात आणि नंतर न्यासाकडून मिळालेला चेक घेतात. परंतु रुग्णांना घेतलेले पैसे परत करत नाहीत. अशा रुग्णालयांना न्यासाने काळ्या यादीत टाकले आहे. आता मदतीचा चेक तयार झाल्यानंतर रुग्ण आणि संबंधित रुग्णालयाला तसा एसएमएस पाठवला जाईल. मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...