आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराला आव्हान, दिग्‍गजांना डावलल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना राज्य सरकारने जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार रद्द करावा, या मागणीसाठी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा पुरस्कार जाहीर करताना पुरस्कार विजेत्याची गुणवत्ता तपासली नाही, तसेच शासनाने घेतलेला निर्णय हा इतर योग्य आणि अधिक पात्र व्यक्तींवर अन्यायकारक असून तो योग्य विचारांती न घेतल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, या पुरस्काराचे वितरण १९ ऑगस्टला सायंकाळी होणार असल्याने उच्च न्यायालयानेही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता याच दिवशी सकाळी सुनावणी ठेवली आहे.
पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे या कार्यकर्त्यांनी ही जनहित याचिका दाखल केली अाहे. यात प्रामुख्याने हा पुरस्कार जाहीर करताना राज्य सरकारने आपल्याच १ सप्टेंबर २०१२ मध्ये जारी केलेल्या शासन निर्णयातील निकषांचे पालन केले नाही, असा आरोप लावण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारने या पुरस्कारासाठी नावाची शिफारस करण्यासाठी नेमलेल्या समितीनेही शिफारस केलेल्या मान्यवरांच्या यादीत पुरंदरे हे नवव्या क्रमांकावर असून त्यांच्या आधी डॉ. प्रकाश आमटे, डॉ.रवींद्र आणि सीमा कोल्हे, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, आशा भोसले, राजदत्त, हिंमतराव बाविस्कर आणि बाबा कल्याणी या मान्यवरांची शिफारस केलेली आहे. तसेच या यादीत शिफारस केलेल्या मान्यवरांमध्ये पद्म पुरस्कार विजेते अनेक मान्यवर असूनही त्यांना डावलून पुरंदरेंना हा पुरस्कार देण्यात आल्याचा अाक्षेपही या जनहित याचिकेत नमूद
करण्यात आला आहे.
काय आहेत निकष?
1. पुरस्कार प्राप्त व्यक्तीने त्याच्या कार्यक्षेत्रात सेवाभावी वृत्तीने किमान वीस वर्षे विशेष आणि उल्लेखनीय काम केलेले असावे.
2. त्या व्यक्तीचे किमान पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असावे.
3. सरकारच्या पद्म पुरस्काराने गौरव झालेल्या व्यक्तींना या पुरस्कारासाठी प्राधान्यक्रम दिला जावा.
यांनी केली निवड
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, सांस्कृतिक कार्य सचिव वल्सा नायर सिंह, चित्रकार वासुदेव कामत, कीर्तनकार मंगलाताई कांबळे, माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा समावेश होता. या समितीत एकही इतिहास तज्ज्ञ नसल्याचा विराेधकांचा अाराेप अाहे.
पुरस्कार वितरण तर होणारच; सरकार ठाम
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास कितीही विरोध होत असला तरी कोणत्याही परिस्थितीत १९ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा रद्द केला जाणार नाही, असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.
बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता राजभवनावर कडेकोट बंदोबस्तात हा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वीचे सोहळे हे गिरगाव चौपाटीवर किंवा एखाद्या सभागृहात सामान्यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे. पुरंदरे यांनाही षण्मुखानंद सभागृहात पुरस्कार वितरण हाेणार हाेते. मात्र राज्यातील विविध संघटनांचा विरोध पाहता या कार्यक्रमाचे स्थळ सरकारने बदलले अाहे.
मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी
‘पुरस्कार विजेत्यांची नावे निश्चित करण्यासाठी निवड समितीची बैठक झाली तेव्हा मुख्यमंत्री गैरहजर होते. त्यामुळे या बैठकीचे अध्यक्षस्थान विनोद तावडे यांनी भूषवले,’ असे निवड समितीतील एका सदस्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. नंतर मुख्यमंत्र्यांनीच या पुरस्कारासाठी पुरंदरे यांच्या नावाची पत्रकार परिषदेत घोषणा केली हाेती.
आमंत्रण मुंबईकरांनाच
विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांसह साहित्यिकांनीही पुरंदरे यांच्या नावाला विरोध केला आहे. हा वाढता विरोध पाहून राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. पुरस्कार सोहळ्याला फक्त मुंबईतील मंत्री आणि आमदारांसह केवळ २५० मान्यवरांनाच बोलवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या कार्यक्रमात काेणताही गोधळ होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला अाहे.