आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी केली तरच शेतकरी उभा राहील, विराेधी पक्षनेते विखे पाटील यांना विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊन तीन दिवस झाले तरी अद्याप म्हणावे तसे कामकाज झाले नाही. बुधवारी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहाचे कामकाज तीनदा बंद पाडले. एकूणच विरोधकांच्या काय मागण्या आहेत, याबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याशी केलेली बातचीत..  

प्रश्न : शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अाग्रह करण्याची कारणे काय अाहेत?  
गेली अनेक वर्षे शेतकरी दुष्काळाने त्रस्त झालेला आहे. यंदा पाऊस चांगला झाला असला आणि पीक भरघोस आले असले तरी भाव घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा आणखी वाढला आहे. शेतकऱ्यांना मदत नव्हे, तर आता कर्जमाफीच देणे आवश्यक आहे. कर्जमाफी केली तरच शेतकरी पुन्हा उभा राहील. शिवसेना कर्जमाफीची मागणी करत आहे. आम्ही मांडलेल्या प्रस्तावाला त्यांनी पाठिंबा द्यावा, नाही तर खिशातून राजीनामे बाहेर काढावेत.   

प्रश्न : कर्जमाफीने बँकांचाच फायदा होतो, असे मुख्यमंत्री म्हणतात. यावर आपले काय म्हणणे आहे?  
मुख्यमंत्री कुठल्या आधारावार असे बोलत आहेत हे  समजत नाही. एकीकडे सरकार खासगी सावकारांची कर्जे माफ करून त्यांचा फायदा करून देत आहेत, तर दुसरीकडे बँकांचा फायदा होईल, असे म्हणत आहे. शेतकऱ्यांना जगवण्यासाठी बँकांच उपयोगी पडतात. बँकांनी कर्ज देणे बंद केले तर शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट होईल. त्याला पुन्हा सावकाराकडे जावे लागेल. सरकारची हीच इच्छा आहे का,  असा प्रश्न उद्भवत आहे. बँकांना कर्जाची रक्कम मिळाली तर ते पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकतील.   

प्रश्न : कर्जमाफीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नाहीत, याबाबत काय सांगाल.   
हासुद्धा अत्यंत चुकीचा समज आहे. मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी पुन्हा तपासून पाहावे, असे मी म्हणेन. २००८ मध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यानंतर शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात प्रत्येक वर्षी कमालीची घट झाली. मात्र, सतत तीन वर्षे पडलेल्या दुष्काळामुळे गेल्या वर्षी पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी विक्रम केला आहे. नऊ हजार आत्महत्या आतापर्यंत झाल्या आहेत.   

प्रशन : राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे का? याबाबत आपले काय मत आहे?  
राज्यातील कायदा सुव्यवस्था मोडकळीस आली आहे. याला कारणही भाजपच आहे. गुंडांना पक्षात प्रवेश देऊन त्यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुंडांना राजाश्रय मिळाल्याने त्यांची गुंडगिरी आणखी वाढली आहे. त्यामुळेच मनोज म्हात्रे यांची क्रूर हत्या झाली. या हत्येत भाजपच्या पदाधिकाऱ्याचा हात असून तो अजूनही फरार आहे. अमरावतीमधील वलगाव येथे सरपंचाची हत्या झाली. या प्रकरणातील आरोपीही अजून फरार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये गुन्हे वाढले आहेत. महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री संपूर्णपणे अपयशी ठरले आहेत.   

प्रश्न : भाजप- शिवसेनेच्या संबंधाबाबत काय सांगाल?    
सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपचे संबंध म्हणजे भारतीय राजकारणातील एक माेठा विनोदच आहे. दोन्ही पक्षांनी एक प्रकारची नौटंकी सुरू केली आहे. मुंबई मनपा निवडणुकीत त्यांनी एकमेकांची औकात काढली. खंडणीबहाद्दर वगैरे विशेषणांनी एकमेकांना हिणवण्यात आले आणि आता पुन्हा एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसले आहेत.
बातम्या आणखी आहेत...