आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी संपाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; दिवाकर रावते यांनी अखेर टेकले हात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पाच एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यात बुधवारी पहाटेपर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र कर्मचारी संघटना आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने तिसऱ्या दिवशीही एसटी संपाचा तिढा सुटू शकला नाही. एसटी संपाचा चेंडू आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला असून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे  कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीच यावर निर्णय घेतील. दरम्यान संपकऱ्यांनी शुक्रवारी जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

राज्य सरकाराचा पगारवाढीचा प्रस्ताव ४ ते ७ हजारांचा आहे, तर आमची मागणी ७ ते ९ हजार इतकी आहे. सरकारच्या प्रस्तावानुसार एसटी महामंडळावर वार्षिक ११०० कोटींचा अतिरिक्त बोजा येणार आहे,  कामगारांच्या मागणीनुसार २००० कोटींचा बोजा येईल. बुधवारी पहाटे दोनपर्यंत परिवहन भवनात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र त्यात तोडगा निघाला नाही, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत ताटे यांनी दिली.
 
कर्मचारी संघटनांबरोबरची चर्चा फिसकटल्यानंतर दिवाकर रावते यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच संपाबाबत सविस्तर चर्चा केली. संपामुळे राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. सातारा, उस्मानाबाद आगारात दिवाकर रावते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी दहन केले. तर कोल्हापुरात रावतेंविरोधांत जोरदार घोषणाबाजी केली. 
 
कुठे मुंडण तर कुठे जागरण गोंधळ घालून निषेध
अहमदनगरमध्ये  जिल्हा प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी खासगी बसेस तैनात केल्या होत्या. नागपूर जिल्ह्यात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या स्टार बसेसवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. बीड डेपोत कर्मचाऱ्यांनी जागरण गोंधळ घालून निषेध व्यक्त केला. पालघर डेपोत मंत्री दिवाकर रावेत यांच्यावर गाणे रचून संपकऱ्यांनी ते गाऊन  संताप व्यक्त केला.  कल्याण येथेली एसटी विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तेथील वीज आणि पाणी गुरुवारी तोडले. रत्नागिरी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईबाबत जिल्हा प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. सिंधुदुर्ग डेपोत कर्मचाऱ्यांनी भजन म्हणत निषेध आंदाेलन केले. संभाजी ब्रिगेड संघटनेने एसटी कर्मचारी संपाला पाठिंबा दिला आहे. पंढरपूर डेपोतील संपकरी कर्मचाऱ्यांचे सामान प्रशासनाने आज बाहेर फेकले.  

सातारा जिल्ह्यातील भोर डेपातून शिवसेनेशी संलग्न असलेल्या कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी काही एसटी बसेस आज रस्त्यावर आणल्या. मात्र त्यांच्यावर दगडफेक होवू नये म्हणून त्या गाड्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी डेपोत एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन करुन सरकारचा निषेध केला. अनेक आगारात लांबच्या जिल्ह्यातील चालक-वाहक अडकून पडले आहेत, त्यांना संघटनेच्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. 
 
५८ हजार फेऱ्या रद्द, ६५ लाख प्रवाशांचा खोळंबा
संप चिघळण्यास परिवहनमंत्री रावते जबाबदार आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. संपामुळे एसटीच्या प्रतिदिन ५८ हजार फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळे ६५ लाख प्रवाशांचा खोळंबा होत असून  महामंडळाला दैनंदिन ३० कोटींचा फटका बसत आहे. गुरुवारी चर्चेचे कोणतेही निमंत्रण कर्मचारी संघटनांना आले नाही, अशी माहिती संपातील सहभागी संघटनांच्या नेत्यांनी दिली. एकंदर दिवाळी संपेपर्यंत संपावर तोडगा निघेल, अशी तूर्त तरी शक्यता दिसत नाही.
 
गुरुवारी दिवसभरात
- कल्याण एसटी विश्रामगृहातील पाणी, वीजपुरवठा तोडला.
- साताऱ्यात कामगार सेनेने काही बस रस्त्यावर अाणल्याने सोय.
- नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी खासगी बसवर झाली दगडफेक.
- पंढरपूर आगारात संपकऱ्यांची सामग्री बाहेर फेकली
बातम्या आणखी आहेत...