आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या योजनांना बाळासाहेबांचे नाव, प्रवाशांना 10 लाखांचा विमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एसटी बस अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास आता १० लाख रुपये विम्यापोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना सुरू केल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी म्हणजे २३ जानेवारी रोजी एसटीच्या नव्या योजनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. विशेष म्हणजे एसटीच्या सर्व नवीन योजनांना शिवसेनाप्रमुखांचेच नाव देण्यात आलेले आहे. आणि या सरकारी कार्यक्रमापासून भाजपच्या सर्व मंत्र्यांना हेतुपुरस्सर दूर ठेवण्यात आलेले दिसते.

योजनांबाबत माहिती देताना रावते म्हणाले, ‘एसटी बसला अपघात झाला तर महामंडळातर्फे नुकसान भरपाई दिली जात होती परंतु ती फार तुटपुंजी होती. त्यात वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार आता अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास १० लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये, अंशतः अपंगत्व आल्यास दोन लाख ५० हजार रु. आणि तात्पुरते अपंगत्व आल्यास एक लाख रुपये दिले जाणार आहेत. मात्र यापोटी प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटांवर एक रुपया अधिभार घेण्यात येणार आहे. या नव्या विम्या योजनेचा फायदा ड्यूटीवर असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनादेखील मिळणार आहे.’
विदर्भ, मराठवाड्यातील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कमी भाडे आकारणारी वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात येणार असून या गाड्यांमध्ये आरामदायी आसने, वाचनासाठी दिवे, सीसीटीव्ही. वाय-फाय, जीपीएस, हँड टॉवेल, बेडशीट, उशी, ब्लँकेट, मोबाइल-लॅपटॉप चार्जर्ससह सीटला नऊ इंची एलईडी स्क्रीनही लावण्यात येणार आहे. या बसेसमध्ये स्वयंचलित अग्निप्रतिबंधक यंत्रणा, धडक प्रतिबंधक प्रणालीही दिली जाणार असून या सेवेला ‘शिवशाही बस सेवा’ असे नाव देण्यात आले आहे. एप्रिल २०१६ पासून अशा ५०० बसेस धावतील. बसेस बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
दुष्काळग्रस्तांना सव्वा सहा कोटी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एसटी कमर्चाऱ्यांतर्फे एक दिवसाच्या पगाराची एकूण रक्कम सहा कोटी २३ लाख रुपये मुख्यमंत्र्यांकडे दिले जातील. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीस ऑटो परमिटसाठी बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना राबवून त्यात १०० टक्के कर्ज दिले जाईल.
काँग्रेसचा विरोध
शासकीय योजनांत पक्ष, धर्माचा उल्लेख करणे हे असंविधानिक. शासनाने तत्काळ हे पाऊल मागे घ्यावे, अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदरच आहे. त्यांच्या नावे योजनांना आक्षेप नाही. परंतु, पक्षाचे नाव योजनांना दिल्याने घातक पायंडा पडेल, असे सावंत म्हणाले.
एक लाखाचे कन्यादान, पुण्यात खास रुग्णालय
- एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना आणली आहे. १ एप्रिल २०१६ नंतर जन्मास येणाऱ्या मुलीच्या नावे १७ हजार ५०० रुपये दामदुप्पट योजनेत ठेवण्यात येणार आहे. मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये दिले जातील.

- एसटी कर्मचाऱ्यांना आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पुणे येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यातील २५ टक्के खाटा महामंडळासाठी आरक्षित ठेऊन या खाटांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
- बसेसच्या दुरुस्तीकरिता हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोटर वाहन अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना. वाशी येथे हे महाविद्यालय स्थापन केले जाणार आहे.
- रिक्षाच्या परवान्यांमध्ये महिलांना पाच टक्के आरक्षण, अबोली रंगाची रिक्षा.