आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य नाट्य स्पर्धेवर सहा निर्मात्यांचा बहिष्कार, इतरांनाही बहिष्काराचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेत गेल्या तीन वर्षातील नाटकांची एकत्रित स्पर्धा घेण्याच्या सांस्कृतिक विभागाच्या निर्णयाविरोधात सहा नाट्य निर्मात्यांनी दंड थोपटले असून राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय या निर्मात्यांनी घेतला आहे. एवढेच नव्हे तर सरकारच्या या तुघलकी नियमाच्या विरोधात अन्य निर्माते, कलाकारांनीही पुढे येऊन बहिष्कार घालावा, असे आवाहनही केले आहे.

भद्रकाली प्रॉडक्शनचे प्रसाद कांबळी यांनी सांगितले, राज्य सरकारतर्फे घेण्यात येत असलेली राज्य नाट्य व्यावसायिक स्पर्धा २०१४ मध्ये झाली नव्हती. यंदा ती घेण्यात येणार आहे २०१४ च्या स्पर्धेसाठी निर्मात्यांनी पैसे भरले होते त्याच निर्मात्यांनी आता पुन्हा पैसे भरले आहेत. २७ वी स्पर्धाच झाली नाही तर २८ वी स्पर्धा कसे म्हटले जाते. तसेच २०१५ च्या स्पर्धेत २०१४ मधील नाटकांचा समावेश केला जात आहे. यासाठी २०१४ मधील नाटकांनी २०१५ मध्ये पाच प्रयोग केलेले असणे अशी अट टाकण्यात आली. तसेच पुनरुज्जीवित नाटकांबाबतही नियमात बदल करण्यात आला आहे. २०१५ मधील नाटकांचाच स्पर्धेसाठी विचार व्हावा अशी मागणी आम्ही केली होती. परंतु सांस्कृतिक विभागाने काहीही केलेले नसल्याने याचा निषेध म्हणून आम्ही सहा निर्मात्यांनी अंतिम फेरीत आमची नाटके न पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
अंतिम फेरीत दहा नाटके असून त्यापैकी प्रसाद कांबळी (हा शेखर खोसला कोण आहे?), लता नार्वेकर (शेवग्याच्या शेंगा), अजित भुरे (सेल्फी), मोहन पटेल/ शेखर लोहकरे (अ फेअर डील) या निर्मात्यांनी आपली नाटके स्पर्धेला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

कांबळी यांनी पुढे सांगितले, आम्ही इतर सर्व कलाकारांना, निर्मात्यांना, तंत्रज्ञांना आणि परीक्षकांनाही या लढ्यात सामील होऊन स्पर्धेच्या पुढील टप्प्यात सहभागी न होण्याचे आवाहन करीत आहोत. आमच्या या मोहिमेत उदय धुरत, संतोष कोचरेकर, प्रदीप कबरे अनंत पणशीकर, प्रभाकर सावंत, वैजयंती आपटे, राजन ताम्हाणे, आनंद म्हसवेकर, गोविंद चव्हाण सामील आहेत असेही प्रसाद कांबळी यांनी सांगितले.
आम्हाला याची कल्पना नाही : अांबेकर
सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर यांना निर्मात्यांच्या बहिष्काराबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, आम्हाला अजून कोणी काहीही कळवलेले नाही. अजित भुरे यांनी एक ईमेल पाठवलेला आहे परंतु त्यावर कोणाच्याही सह्या नाहीत. आम्ही सर्व निर्मात्यांकडून होकार घेतले होते. आम्ही नियमानुसार स्पर्धा घेत असून त्यांचा नक्की कशाला आक्षेप आहे ते आम्हाला समजलेले नाही. एक नाटक जरी राहिले तरी आम्ही स्पर्धा घेऊच असेही अजय आंबेकर यांनी स्पष्ट केले.