आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील रेल्वे प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करणार, रेल्‍वे मंत्री सुरेश प्रभूंची घाेषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रेल्वे अर्थसंकल्पात राज्यातील प्रकल्पांना भरीव काही देण्यास असमर्थ ठरलेल्या केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी मात्र विदर्भ-मराठवाड्यासह मुंबईच्या पदरात भरभरून दान टाकले. राज्यातील सर्व म्हणजेच सहा महसूल विभागांना एकमेकांशी जोडण्यासाठी रेल्वेचे विस्तृत जाळे निर्माण करण्यात येणार असून यासाठी २२ हजार ९७६ कोटी रुपयांचे नऊ प्रकल्प चार वर्षांत पूर्ण केले जातील, अशी घाेषणा प्रभू यांनी गुरुवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत प्रभू यांनी गुरुवारी मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. या वेळी रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रभू यांनी सांगितले, ‘राज्यातील महत्त्वाची ४० रेल्वेस्टेशने अत्याधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहेत. या रेल्वेस्थानकांवर शॉपिंग मॉल्स, दुकाने, कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच नऊ रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे विदर्भ-मराठवाडा जोडणे जसे शक्य हाेईल तसेच कोल्हापूर ते कोकण असा मार्ग तयार झाल्याने कोकणात जाणे सोपे होईल. राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रकल्प पूर्ण केले जाणार असून यासाठी रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारची संयुक्त महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. ही कंपनी रेल्वे प्रकल्प पूर्ण करून रेल्वेच्या ताब्यात देईल. रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या कंपनीचा त्या रेल्वेमार्गांवर कोणताही हक्क राहणार नाही.’

मुंबईत एसी लाेकल, सीएसटीचे नूतनीकरण : मुंबईतील जनतेला मेट्रो, मोनो, हार्बर, सेंट्रल, पश्चिम रेल्वे, बेस्ट बसेस आणि शेअरटॅक्सीसाठी एक तिकीट पद्धत सुरू करण्यात येणार असून हे तिकीट मोबाइलद्वारेही काढता येईल. मुंबईमध्ये टॅल्गो या स्पॅनिश कंपनीच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर भुयारी रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले. मुंबईत एसी लोकल १५ मे पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असून ऑगस्टपासून ही लोकल धावू शकेल. तसेच छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस या नावाला साजेल अशा प्रकारे या स्थानकाची फेररचना करण्यात येऊन तेथे गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींसह शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल. तसेच १५ रेल्वेस्थानकांवर वायफाय सुविधा पुरवण्यात येणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, नगर- बीड- परळी मार्गाला येणार गती, मुंबईत एसी लाेकल