आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये तीव्र मतभेद, कामत, निरुपम यांचा विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपची घोडदौड रोखण्याची चाल खेळायची की तटस्थ राहायचे, यावरून काँग्रेस पक्षामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेसचा प्रत्येक नेता आपल्या विचारांचे घाेडे दामटत असून मुंबईबाबत काँग्रेस काय निर्णय घेणार हे शनिवारी स्पष्ट होऊ शकले नाही.
 
शिवसेनेला चार अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सेनेचे पालिकेतील संख्याबळ ८८ झाले असून मुंबईत सत्तास्थापनेसाठी ११४ नगरसेवकांची गरज आहे. सेनेला २६ नगरसेवक अजूनही कमी पडतात. काँग्रेसकडे ३१ नगरसेवक असून काँग्रेसने प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पाठिंबा दिला तर सेना सहाव्यांदा मुंबईच्या सत्तेचा सोपान चढू शकते.
 
मतभेदांचा अडसर
काँग्रेस पक्षात सेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून तीव्र मतभेद आहेत. मुंबईतील काँग्रेसचे बुजुर्ग नेते गुरुदास कामत यांनी सेनेला पाठिंबा देण्यावरून कमालीचा विरोध दर्शवला आहे. ‘शिवसेनेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्यास मतदार आपल्याला माफ करणार नाहीत,’ अशी भूमिका कामत यांनी घेतली आहे.
 
राणे इच्छुक, निरुपम विराेधात
कामत यांचे कट्टर विरोधक व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिवसेनेने पाठिंब्याबाबत विचारले होते, पण आम्ही नकार दिला’ असे सांगून हा विषय संपवला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ‘राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो’ असे सांगत शिवसेनेशी सलगी करण्यास आपण सकारात्मक असल्याचे संकेत दिले. 
 
एकत्रित निर्णय घेता येईल
खासदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘काँग्रेससमोर सर्व पर्याय खुले आहेत, सेनेकडून विचारणा झाल्यास काँग्रेसचे नेते एकत्रित निर्णय घेतील, असे स्पष्ट केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, “राष्ट्रवादी पक्षाशीसुद्धा यासंदर्भात चर्चा करावी लागेल, तसेच काँग्रेस हायकमांडचे मतही विचारात घ्यावे लागेल’, असे सांगत चेंडू हायकमांडच्या कोर्टात टाकला आहे.
 
मुस्लिम मतदार दुरावण्याची भीतीनिवडणूक आहे. त्यामुळे इतक्यात पाठिंब्याचा तिढा सुटण्याची शक्यता नाही. सेनेला पाठिंबा दिल्यास मुस्लीम मतदार नाराज होईल, अशी काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे बहुमतावेळी अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन सेनेचा महापौर होईल, अशी काँग्रेस चाल खेळू शकते, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.  
 
‘अस्पृश्य काेणी नाही’ 
१९७८ मध्ये शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रसचे मुरली देवरा मुंबईचे महापौर झाले हाेते. मुख्यमंत्री व काँग्रेस नेते वसंतराव नाईक यांच्या पाठबळावर सेना मुंबईत वाढली. त्यामुळे सेनेला ‘वसंत सेना’ म्हटले जाई. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने विनाशर्त पाठिंबा दिला होता. हा इतिहास पाहता आगामी काळात काँग्रेस-सेना युती अशक्य नाही, असेच चित्र आहे.
 
काँग्रेसचा सेनेला पाठिंबा मिळणे कठीणच
- काँग्रेस सेनेला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. भाजप शिवसेना एकत्र न आल्यास मुंबईत सत्ता स्थापन करणे अवघड होईल. त्यामुळे पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ येईल. 
- रामदास आठवले, खासदार, रिपाइं
 
मतदारांनी नाकारलेल्यांचा पाठिंबा कशाला ?
- मतदारांनी नाकारलेल्या पक्षाचा पाठिंबा काय कामाचा? शिवसेना-भाजप युती कायम राहायला हवी. रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री फडणवीस योग्य तो निर्णय घेतील.
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...