मुंबई - ३१ जानेवारी रोजी मुंबईत काढण्यात येणारा नियोजित मराठा मूक मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती मराठा आरक्षण समन्वय समितीच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकारांना दिली. १५ जानेवारी रोजी यासंबंधी बैठक घेण्यात येणार असून त्यात मोर्चाची नवी तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी सांगितले.
औरंगाबाद येथील बैठकीत मुंबईत काढावयाच्या मराठा मूक महामोर्चाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्या वेळी मुंबई आणि परिसरातील मराठा मोर्चाच्या संयोजकांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असा मुंबई भागातील संयोजकांचा सूर आहे. फेब्रुवारीमध्ये मुंबईत महापालिका निवडणूक होत आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात मोर्चा काढणे सयुक्तिक हाेणार नाही, असे समितीचे निमंत्रक अनिल निगडे -पाटील यांनी मराठी’शी बोलताना सांगितले. मुंबईत परळ भागात असलेल्या दामोदर हाॅल येथे या मोर्चासंबंधी रविवारी बैठक झाली. यात रायगड, पालघर, ठाणे आणि नवी मुंबईतून मराठा मोर्चाचे संयोजक आले होते. त्यामध्ये एकमताने ३१ जानेवारीच्या मोर्चास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती समितीचे पदाधिकारी सुनील मोरे आणि सुभाष जावळे यांनी दिली.
पहिला भव्य मूक मोर्चा औरंगाबादेत काढण्यात आला होता. नंतर राज्यात सर्वत्र हे मूक मोर्चे काढण्यात आले. अॅट्रॉसिटी, आरक्षण अशा मुद्द्यांवर मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारला या माेर्चाच्या माध्यमातून निवेदने देण्यात आली. आता मुंबईत निघणारा नियोजित मराठा मोर्चा राज्यातील शेवटचा मोर्चा अाहे. त्यात सुमारे १ कोटी मराठा बांधव एकत्र आणण्याचे संयोजकांचे नियोजन आहे.
मुंबईतील मूकमोर्चा ३१ राेजी निघणारच : विनोद पाटील
औरंगाबाद - मराठा क्रांती मूकमोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत ठरल्यानुसारच ३१ जानेवारीला मोर्चा निघणार आहे. मुंबईत शासनाच्या काही हस्तकांनी परस्पर मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली, ती चुकीची आहे. राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकदा मोर्चासंबंधी नियोजन झाल्यानंतर केवळ मुंबईतील लोक कसे ठरवू शकतात? त्यांना असे ठरवण्याचा अधिकार कुणी दिला, असा प्रश्न विनोद पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे एकदा राज्यातील पदाधिकाऱ्यांनी ठरवल्यानंतर मोर्चा निघणारच. दोन लोक यासंबंधी निर्णय घेऊ शकत नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)