आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट : सुनील तटकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात सत्तांतर होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला असून या तीन वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून अजूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातील राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणाबाबतच्या चर्चासत्रात बोलताना त्यांनी ही टीका केली.    

तटकरे म्हणाले, या सरकारने शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ऑनलाइन अर्जात चुकीची माहिती भरली तर फौजदारी कारवाई केली जाईल, असे सरकार म्हणते. शेतकऱ्याने चुकीने माहिती भरली तर त्याच्यावर कारवाई होईल, अशी भीती त्यांच्यात आहे. २०१४ ते आतापर्यंत हे भाजपचे सरकार आहे, शिवसेना त्यांच्यामागे फरपटत आहे. सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाविरोधात शिवसेना प्रखर टीका करते. जे निर्णय प्रक्रियेत आहेत तेच सरकारविरोधात मोर्चा काढतात, ही विसंगती आपण जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. सोशल मीडियावर सरकारचे सुरुवातीला कौतुक होत होते. मात्र, तीन महिन्यांपासून सोशल मीडियावर सरकारविरोधात वातावरण आहे. याचा लाभ घेत पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहनही तटकरे यांनी या वेळी केले.
बातम्या आणखी आहेत...