आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘युती’बाबत मुख्यमंत्र्यांची मात्र हाताची घडी अन् तोंडावर बोट, शिवसेना म्हणते निर्णय घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांची युती होईल की नाही याबाबतीत संभ्रम वाढतच चालला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे, असे जाहीर केले आहे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपने लवकर निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात विचारले असता औरंगाबादला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अक्षरश: हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवले. 

जिल्हा परिषद, महानगरपालिका  व पंचायत समितीच्या निवडणुकांत शिवसेनेशी युती करण्याची भाजपची तयारी आहे. ‘वर्षा’वर झालेल्या भाजप पालकमंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीसाठी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिली. असे असले तरी भाजपने आपला निर्णय लवकर घ्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पोलिस क्रीडा स्पर्धांच्या उद््घाटनासाठी औरंगाबादला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता एक शब्दही न बोलता त्यांनी हाताची घडी घातली आणि तोंडावर बोट ठेवले.
 
उद्या-परवा निवडणूक आयोगच युतीची नव्हे तर निवडणुकीची घोषणा करेल : उद्धव ठाकरे
शिवसेना-भाजपची युती होणार की नाही हे लवकरात लवकर आम्हाला सांगावेच लागेल. नाही तर निवडणुका होऊन जातील,अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या युतीबाबतच्या पुढाकारावर दिली.  उद्या-परवा निवडणूक आयोगच युतीची नव्हे तर निवडणुकीची घोषणा करेल. निवडणुकीला जास्त दिवस राहिलेले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर युतीचा निर्णय घोषित झाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याप्रमाणेच उद्धवही युतीबाबत सकारात्मक असल्याचेच चित्र मंगळवारी दिसलेे. दोघेही तयार आहेत तर युती जाहीर का होत नाही, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
 
युतीचे सांगितले जाणारे उघड कारण
सत्ताप्राप्तीसाठी नव्हे, तर सामान्य लोकांची कामे वेगाने व्हावीत म्हणून...
आगामी निवडणुकांत भाजपला शिवसेनेशी युती करायची आहे ती सत्ताप्राप्तीसाठी नव्हे तर सामान्य माणसांची कामे वेगाने होण्यासाठी, असे  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेे. मतांची विभागणी होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न युतीचा आहे. शेवटी चर्चेतूनच युतीच्या जागा निश्चित होतील. युतीत दोघांचेही संपूर्ण समाधान होणार नाही. दोघांनाही एकमेकांना काही जागा सोडाव्या लागतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.
 
युतीसाठी पुढाकाराचा भाजपचा छुपा हेतू
फिसकटलेच तर दोष शिवसेनेच्या माथी मारून नामानिराळे होता यावे म्हणून...
मुंबई व ठाणे महानगरपालिका  महत्त्वाच्या असून  तेथील सत्ता शिवसेनेच्या राजकारणाचा मुख्य गाभा राहिला. येथे शिवसेना सर्व शक्ती पणाला लावणार. प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांना तसे आदेश गेले आहेत. त्यामुळेच भाजपने युतीच्या बोलणीसाठी पुढाकार घेतला. चर्चा फिसकटलीच तर आम्ही तयार हाेतो, शिवसेनेचीच इच्छा नव्हती, अशी भूमिका चलाखपणे लोकांसमोर मांडण्यास भाजप मोकळा होईल. 
 
शत-प्रतिशत युती अशक्य : लोकसभा व विधानसभेत सर्व जागांवर युती होऊ शकते. मात्र या निवडणुकीत १०० % युती शक्य नाहीे. स्थानिक अडचणी लक्षात घेता ७० ते ८०% युतीची शक्यता असते, असे मुनगंटीवार म्हणाले.
 
निर्णय जिल्हा पातळीवरच- दानवे
युतीची इच्छा आहे. पण जिल्हा परिषद निवडणुकीत युती करायची की नाही, हा निर्णय जिल्हा पातळीवर हाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे नांदेडमध्ये म्हणाले.