मुंबई - महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्यांतर्गत करभरणा करण्यास पात्र असणाऱ्या व्यापाऱ्यांना विक्रीकराचा भरणा विहीत मुदतीत करणे आवश्यक आहे. विहीत मुदतीपेक्षा उशिरा कर भरल्यास सध्या दरमहा १.२५ टक्के व्याज आकारण्यात येते. या व्याजदरामध्ये एक डिसेंबर २०१५ पासून बदल करण्यात आला असल्याची माहिती विक्रीकर उपआयुक्त (जनसंपर्क) यांनी कळवली आहे.
प्रलंबित कराचा कालावधी एक महिन्यापर्यंत असल्यास अशा कराच्या रकमेवर त्या महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी कराच्या १.२५ टक्के, प्रलंबित कालावधी तीन महिन्यापर्यंत असल्यास कराच्या रकमेवर विलंब झालेल्या पहिल्या महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी १.२५ टक्के आणि अशा कराच्या रकमेवर पुढील एक महिन्यापासून तीन महिन्यांपर्यंतच्या विलंब झालेल्या प्रत्येक महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी १.५० टक्के कर आकारण्यात येतो. तसेच तीन महिन्यांपेक्षा जास्त प्रलंबित कालावधी असल्यास अशा कराच्या रकमेवर पाहिल्या महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी १.२५ टक्के, पुढील एक महिन्यापासून तीन महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्यासाठी व त्याच्या भागासाठी १.५० टक्के आणि तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित राहिल्यास प्रत्येक महिन्यासाठी व त्याच्या भागासाठी २ टक्के इतके व्याज एक डिसेंबर २०१५ पासून आकारले जाणार आहे. यामुळे करदात्यांना प्रलंबित करासाठी जास्त व्याज शासनास द्यावे लागेल. त्यामुळे व्यापाऱ्यांनी प्रलंबित थकबाकी मुदतीत करावी, असे आवाहन विक्रीकर विभागामार्फत करण्यात आले आहे.