आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सर्व खासगी अनुदानित शाळांत शिक्षक भरती अॅप्टिट्यूड टेस्टद्वारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील सर्व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती आता अभियोग्यता (अॅप्टिट्यूड) आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षण सेवकांच्या भरतीसाठी होणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षा (सीईटी) रद्द करण्यात आली आहे. मात्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा व अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांमधील भरतीस ही चाचणी प्रक्रिया लागू राहणार नाही.
 
२०० गुणांची परीक्षा : शिक्षण सेवक भरतीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून २०० गुणांची राज्यस्तरीय समान काठिण्य पातळी चाचणी परीक्षा घेतली जाईल. इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी)  उत्तीर्ण उमेदवार परीक्षेस अर्ज करण्यास पात्र ठरतील. 

गुणांच्या आधारेच होणार निवड :  या चाचणीत मिळालेल्या गुणाच्या आधारावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी शैक्षणिक संस्थांना गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करावी लागणार आहे. या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांना रिक्त पदे आणि आरक्षण विषयक बाबींच्या अंतर्भावासह संबधित संगणकीय प्रणालीवर किमान १५ दिवसांकरिता प्रसिद्ध करावी लागणार आहे. कोणत्याही वर्षी प्राप्त झालेले चाचणीचे गुण कोणत्याही वर्षाच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र राहणार आहे.

उमेदवारास ५ वेळा संधी मिळणार : अभियोग्यता चाचणी देण्याची संधी उमेदवारास ५ वेळा मिळणार असून यातील जास्तीत जास्त गुणांच्या आधारे संबंधित संस्थेकडे संगणकीय प्रणालीच्या आधारे अर्ज करता येईल. तसेच राज्यातील सर्व शासन सहाय्यित संस्थांतर्गत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च शाळांमधील शिक्षण सेवकांची रिक्त पदावर भरती करताना कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार ‘सरल’ प्रणालीवरील नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची मान्यता करण्यात येणार आहे. तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी  जाहिरात “पवित्र” या संगणकीय प्रणालीमध्ये किमान १५ दिवसांच्या कालावधीसाठी व संस्थांकडून  वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होईल. 
बातम्या आणखी आहेत...