आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मित्रों’ शब्दाची आज वाघाएवढी भीती वाटते, पंतप्रधान मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मी कायम मराठीत बोलतो, हिंदीत आज भाषण करताना सुरुवात सुचत नाही. पण मी ‘मित्रों’ शब्द काही उच्चारणार नाही. ‘मित्रों’ शब्दाची लोकांना आज खऱ्या वाघाइतकी भीती वाटते. हा शब्द उच्चारताच लोक पळून जातात, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.   

नरिमन पॉइंट येथील हाॅटेल ट्रायडंट येथे कमल मोरारका यांच्या ‘रोअर-वाॅक थ्रू द वाइल्ड लाइफ’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव यांच्या हस्ते बुधवारी झाले.  या वेळी व्यासपीठावर प्रख्यात लेखक प्रीतीश नंदी, वन्यजीव क्षेत्रातील कार्यकर्ते बिट्टू सहगल आणि पुस्तकाचे लेखक कमल मोरारका हजर होते.  

मोदी यांचा नामोल्लेख न करता ठाकरे म्हणाले, ‘वाघ वाघिणीला कधी छेडत नाही. भूक लागल्याशिवाय तो शिकारही करत नाही. माणूस मात्र अमर्याद अन्न साठवतो, छेडछाडही करतो, तरीही आपण स्वत:ला सिव्हिलाइज्ड कसे समजतो,’ असा प्रश्न त्यांनी विचारला. ‘वाघ वाचवायचे असतील तर ‘वाघाला’ मदत करा,’ असेही उद्धव उपस्थितांना म्हणाले.   

‘शहरात हवा शुद्ध व्हावी म्हणून आज आपण मशीन लावतो. त्याच वेळी हवा शुद्ध करणारी झाडे मात्र तोडून टाकतोय. नवी झाडे लावायचे सोडा, आहेत ती तरी जगवा,’ असे अावाहन त्यांनी या वेळी केले. ‘म्हणूनच शिवसेना मुंबईतील आरे काॅलनीत होणाऱ्या मेट्रो कार शेडला विरोध करतेय,’ असा खुलासाही उद्धव यांनी आपल्या भाषणात केला. ‘कमल’चे हे पुस्तक पाहून मला हेवा वाटला. पूर्वी मी हाती कॅमेरा घेऊन जंगलं हिंडायचो. राजकारणामुळे आता वेळ नाही मिळत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच मुंबई महापालिकेने परदेशातून प्राणिसंग्रहालयात आणलेल्या पेंग्विनसंदर्भात होत असलेल्या टीकेचा त्यांनी जोरदार समाचार घेतला.  
 
चहावाल्याचं कायमच ऐकण्यात येतंय  
‘सध्या शिवसेनेत खूप लोक येत आहेत, त्यामुळे मला वेगळा पत्ता देण्याची गरज नाही वाटत. पण आजकाल ‘त्या’ चहावाल्याचं कायमच ऐकण्यात येतंय,’ असा टोला ठाकरेंनी मोदींना लगावला.