आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा केले विरोधकांना चीत; मेहता, देसाई यांना अभय देण्यात यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखली होती. मात्र, यात विरोधक म्हणावे तसे यशस्वी ठरले नाहीत. खरे तर या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करण्याची चांगली संधी विरोधकांना मिळाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय चतुराईने विरोधकांना चीत केले आणि आरोपाच्या पिंजऱ्यात असलेल्या मंत्र्यांना पाठीशी घातल्याने पुन्हा एकदा विरोधी पक्ष सरकारसमोर नामोहरम झाल्याचे तीन आठवड्यांच्या अधिवेशनात दिसून आले.   

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी एका एसआरएच्या फाइलवर मुख्यमंत्र्यांना अवगत न करताच मारलेला शेरा, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीची आरक्षित जमीन आरक्षणातून वगळल्याचा आरोप यासोबतच विरोधकांच्या हाती सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलने शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेले कर्ज असा विषयही विरोधकांकडे होता. याशिवाय शेतकरी कर्जमाफीही महत्त्वाची होती. तसेच शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, पावसाने ओढ दिल्याने विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील शेतकऱ्यांपुढे उभे राहिलेले संकट, मुंबई विद्यापीठाने निकालात घातलेला घोळ,  जलयुक्त शिवार योजनेत झालेला भ्रष्टाचार यावरही विरोधक सरकारला घेरतील अशी अपेक्षा होती.  अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सविस्तर निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामुळे विरोधकांच्या हाती असलेल्या शस्त्राची धारच बोथट झाली. त्यामुळे पहिल्या आठवड्यात विरोधक चीत झाले. विशेष म्हणजे विरोधकांनीही कर्जमाफीबाबत विधिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा मांडण्यात आलेला ठराव मान्य करून मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली. यामुळे विरोधकांत फूट पडल्याचे दिसले.

दुसऱ्या आठवड्यात विरोधकांनी प्रकाश मेहता यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला आणि सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.  मेहतांसोबत  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा एमआयडीसीची जमीन आरक्षणातून वगळण्याचा मुद्दा विरोधकांनी कागदपत्रांसह विधिमंडळात सादर केला आणि सरकारला दुसरा आठवडा भारी पडणार असे वाटत होते,  परंतु सरकारने चलाखी करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीबाबत अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यामुळे विरोधकांनी कामकाजात भाग घेतला.

तिसऱ्या आठवड्यात विरोधक शांत  
मात्र, विरोधकांची ही आक्रमकता तिसऱ्या आठवड्यात कमी झालेली दिसली. इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आल्याने काँग्रेसच्या नेत्यांना कामकाजात भाग घ्यावा लागला. याच आठवड्यात मराठा मोर्चा होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय चतुराई दाखवत खासदार संभाजीराजे आणि नारायण राणे यांना पुढे केले. तसेच सुभाष देशमुख यांच्यावर चर्चेची जबाबदारी टाकली. विधान भवनात मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी बोलणी केली आणि त्यांचे समाधान केले. मराठा मुलांच्या शिक्षणाबाबत ठोस योजना आखत त्यांनी मराठ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
बातम्या आणखी आहेत...