आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXLCUSIVE: राज्यातील 76 हजार शाळांचा परिसर तंबाखूमुक्त; तक्रारीसाठी हेल्पलाइनची सोय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शैक्षणिक संस्था आणि शाळांच्या आवारात तंबाखूसह, तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर कायद्याने बंदी आहे. गेल्या पाच महिन्यांत आरोग्य विभागाकडून धडक कारवाई करून राज्यातील सुमारे ७६ हजार ४२७ शाळांचा परिसर तंबाखूमुक्त केला आहे. यात सर्वाधिक वर्धा येथील ७० शाळांचा समावेश आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांकडून सुमारे १ लाख २९ हजार २१४ रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.    

जागतिक सर्वेक्षणानुसार  देशात १३ ते १५ वयोगटातील १४ टक्क्यांपेक्षा अधिक मुले तंबाखूचे सेवन करतात. लहान वयात तंबाखूची सवय लागल्याने ही सवय सोडणे कठीण जाते. त्यामुळे  विविध असंसर्गजन्य आजार होण्याचा धेाका असतो. त्यामुळे   केंद्र शासनाने ‘सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३’  केला आहे. या कायद्यानुसार  शाळांच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटरच्या परिघात  तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही अनेक शाळा परिसरात पानटपऱ्या सुरू आहेत. त्यामुळे अशा पानटपऱ्यांवर आरोग्य विभागाकडून कारवाई करून त्या बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अाराेग्य विभागाकडून देण्यात अाली.    
 
तब्बल १२ हजार १४१ नागरिक तंबाखूमुक्त   
आरोग्य विभागाकडे ऑनलाइन स्वरूपात  सुमारे २०० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसारच आरोग्य विभागाच्या पथकाकडून ही कारवाई केली आहे. तसेच तंबाखू नियंत्रण केंद्रात मार्चपर्यंत १ लाख ९४ हजार ८३२ नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे १२ हजार १४१ नागरिकांना तंबाखूमुक्त करण्यात आले आहे. तसेच २,१९० आरोग्य संस्थाही तंबाखूमुक्त करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात अाली.   
 
जगभरात दरवर्षी ६० लाख मृत्यू  
तंबाखू सेवनाने जगभरात दरवर्षी जवळपास ६० लाख लोकांचा मृृत्यू होतो.  सर्वेक्षणानुसार २०३० पर्यंत जगात ८० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हा तंबाखूच्या सेवनामुळे होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.  तंबाखूचा वाढता वापर आणि त्याच्या दुष्परिणामांमुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक समस्या म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे दरवर्षी ३१ मे  हा जागतिक तंबाखूविरोधी दिन साजरा केला जातो. यंदा आरोग्य विभागाच्या वतीने विकासाला खीळ ही थीम ठरवण्यात आली आहे. तंबाखूमुळे मधुमेह,  रक्तदाब, हृदयविकार असे आजार  उद््भवतात.
 
तंबाखू विक्रीबाबतची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइनची साेय 
शासकीय कार्यालये, रेल्वेस्टेशन, बसस्टॉप आदी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास कायद्यानुसार २०० रुपये दंड आकारला जातो. गेल्या पाच महिन्यांत १ लाख २९ हजार २१४  रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पण हा दंड अत्यल्प असल्याने धूम्रपान करणारे दंड भरण्यास तयार होतात. त्यामुळे कायद्यात दंडाची रक्कम वाढवल्यास याला चांगलाच आळा बसेल  तसेच रस्ता हा सार्वजनिक विभागात मोडत नाही.  त्यामुळे त्याचाही समावेश या कायद्यात झाला पाहिजे, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.  तसेच नागरिक  तंबाखू विक्रीसंदर्भातील तक्रार ८००११०४५६ या हेल्पलाइनवर करू शकतात.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...