आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन माजी आमदारांना लागले नगरसेवकपदाचे वेध (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिकेच्या आखाड्यात यंदा कधी नव्हे ते चक्क तीन माजी आमदार नगरसेवक हाेण्यासाठी उतरले आहेत. जवळपास सर्वच पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर उतरल्याने अचानक उमेदवारांची चणचण भासू लागल्याने अडगळीत गेलेल्या या माजी आमदारांना पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात परतण्याची संधी मिळाली आहे. 
 
मात्र सध्याचे राजकीय चित्र पाहता भाजपचे अतुल शहा, शिवसेनेच्या विशाखा राऊत आणि सध्या मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले मंगेश सांगळे या माजी आमदारांसमोरचे आव्हान अधिक कडवे आहे.

निवडणुकीपूर्वी मित्रपक्षावर दबाव टाकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली मुंबईत स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचा दावा केला हाेता. खरोखर जेव्हा स्वबळावर लढण्याची वेळ आली तेव्हा मात्र अनेकांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागली. त्यासाठी ऐनवेळी अनेकांचे पक्षप्रवेश घडवून आणले गेले.
 
तरीही अनेक ठिकाणी उमेदवार मिळण्यात अडचणी येत असल्याने सक्रिय राजकारणातून हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेकांना ‘लॉटरी’ लागली. अाता या तिन्ही माजी अामदारांपैकी काेण नगरसेवकपदी निवडून येते हे २३ फेब्रुवारीलाच कळणार अाहे.
 
- दक्षिण मुंबईच्या उमरखाडी मतदारसंघातून सुमारे पंधरा वर्षांपूर्वी आमदारपद भूषविलेले भाजपचे नेते अतुल शहा हे सध्या मुंबईतील प्रभाग क्रमांक २२० मधून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे तगडे उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक सुरेंद्र बागलकर आहेत. बागलकर हे यापूर्वी बेस्ट समितीचे सभापती राहिलेले असून त्यांच्या या प्रभागात चांगलाच जोर आहे.
 
- दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून शिवसेनेच्या आमदार राहिलेल्या तसेच एकदा मुंबईचे महापौरपद भूषवलेल्या विशाखा राऊत या प्रभाग क्रमांक १९१ मधून पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. राऊत यांच्यासमोरही मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडेंचे तगडे आव्हान आहे. तहसीलदार असलेल्या स्वप्ना देशपांडे यांनी आपल्या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. शिवाय एक सक्रिय नगरसेवक म्हणून त्यांचे पती संदीप देशपांडे हे प्रभागात चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे राऊत यांना विजयासाठी अधिक जोर लावावा लागणार आहे.
 
- मंगेश सांगळे हे २००९ ते २०१४ दरम्यान विक्राेळीतून मनसेचे आमदार होते. त्याअगोदर २००७ ते २०१२ या कालावधीत ते विक्रोळीतूनच नगरसेवक होते. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी त्यांना पराभूत केले.
 
काही दिवसांपूर्वी सांगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून पुन्हा एकदा ते कन्नमवारनगरातून नगरसेवक म्हणून नशीब आजमावत आहेत. त्यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक जयंत दांडेकर हे मनसेचे उमेदवार म्हणून त्यांच्यासमोर उभे ठाकले असून आमदार सुनील राऊत यांचे समर्थक उपेंद्र सावंत हे शिवसेनेकडून मैदानात आहेत. त्यामुळे सांगळे यांचा विजय नक्कीच सोपा नसेल.
 
बातम्या आणखी आहेत...