आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी रुग्णांवरील उपचारासाठी प्रमाणित कार्यप्रणाली करणार; शायमाच्या आरोपानंतर सरकारची पावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इजिप्तच्या इमान अहमद या जगातील सर्वात लठ्ठ महिलेवरील उपचारांनंतरही तिची बहिण शायमाने डाॅक्टरांवर केलेल्या आरोपसत्रानंतर राज्य सरकारने  राज्यातील विविध रुग्णालयांत परदेशी रुग्णांसंबंधीची आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या माहितीच्या आधारे परदेशी रुग्णावरील उपचारांसंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. वेगाने विस्तारणाऱ्या राज्यातील वैद्यकीय पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठीचे हे प्रयत्न असून उत्तम कार्यप्रणाली तयार करून परदेशी रुग्णांना आकर्षित करण्याचा प्रमुख उद्देश आहे.    
 
पाचशे किलाे वजन असलेल्या इमानवर उपचार करणाऱ्या मुंबईतील सैफी रुग्णालयाच्या डॉक्टर्सवर तिच्या बहिणीने केलेल्या आरोपामुळे भारतीय वैद्यकीय क्षेत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाली. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत ८० टक्क्यांनी स्वस्त वैद्यकीय सेवा आणि दर्जेदार मनुष्यबळाच्या जोरावर वेगाने विस्तारत असलेल्या राज्यातील वैद्यकीय पर्यटनावर या घटनेमुळे विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी असे कटू प्रसंग टाळण्यासाठी आता सार्वजनिक आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.   

राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या माहितीनुसार परदेशी रुग्णांना सेवा देणाऱ्या राज्यातील सर्व रुग्णालयांकडून सध्या माहिती मागवण्यात येत आहे. संबंधित रुग्णालयात दरवर्षी किती रुग्ण परदेशातून येतात, काेणत्या देशातील रुग्णांची संख्या अधिक आहे, संबंधित रुग्ण आपापल्या देशाच्या राजकीय दूतावासामार्फत परवानगी घेतात की स्वत:च्या जबाबदारीवर उपचारांना सामोरे जातात, अशा स्वरूपाची माहिती आरोग्य विभागाला अपेक्षित अाहे. या माहितीच्या आधारे वैद्यकीय पर्यटनाबाबत एक प्रमाणित कार्यप्रणाली तयार करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यामुळे इमान अहमदच्या उपचारादरम्यान झालेल्या आरोपसत्राची पुनरावृत्ती टाळण्याचा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.  

वैद्यकीय पर्यटनाची भारतात माेठी बाजारपेठ   
पाश्चिमात्य देशांमध्ये वैद्यकीय उपचार प्रचंड महाग असून त्या तुलनेत भारतातील वैद्यकीय सेवा ८० टक्क्यांनी स्वस्त आहे. अवयव प्रत्यारोपणासारखे उपचार तर भारतात दसपटीने स्वस्त असल्याने जगभरातील तब्बल ५५ पेक्षा अधिक देशातील रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात. सध्या वार्षिक दीड ते दोन हजार कोटींची वैद्यकीय पर्यटनाचीही बाजारपेठ येत्या काही वर्षांत दहा हजार कोटींवर जाऊ शकेल, असा अंदाज सीआयआय मॅकेंझी या संस्थेने व्यक्त केला आहे. प्रामुख्याने चेन्नई, मुंबई, गोवा, दिल्ली आणि अहमदाबाद या पाच शहरांमध्ये उपचार घेण्याचा परदेशातून येणाऱ्या रुग्णांचा कल असतो.    

औरंगाबाद, नाशिक, पुणे शहरही हॉट डेस्टिनेशन्स   
राज्यात मुंबईखालोखाल औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि नाशिक या शहरांमध्येही तुरळक संख्येने परदेशी रुग्ण उपचारासाठी येत असतात. औरंगाबादमध्ये कमलनयन बजाज, धूत रुग्णालय, डॉ. संतपुरे रुग्णालय, सिग्मा, पटवर्धन आणि एमजीएम यासारख्या रुग्णालयात तर परदेशी रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. यासोबतच लीलावती आणि वोक्हार्टसारखी रुग्णालयेही औरंगाबादमध्ये येण्यास उत्सुक आहेत. नाशिकमध्येही वोक्हार्ट, लोटस, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट यासारखी रुग्णालये विदेशी रुग्णांना आकर्षित करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...