आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरेदी केलेल्या तुरीची डाळ करून सरकार 55 रु. किलोने विकणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बंपर तूर उत्पादनामुळे सरकारने नाफेडच्या सहकार्याने बाजार हस्तक्षेप योजनेतून तूर खरेदी केली होती. सरकारकडील या तुरीची भरडई करून ती राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिकेवर ५५ रुपये किलोने तूरडाळ विकण्यात येणार आहे. तसेच ई-निविदेद्वारे डाळीची खुल्या बाजारात ऑफसेट किंमत ५५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी १० लाख क्विंटल तूर उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृहे, पूरक पोषण आहार आदी योजनांतही तूरडाळ विक्री होईल. 


मंत्रिमंडळ बैठकीत रेशन दुकानांवर तूरडाळ विक्रीस मंजुरी देण्यात आली. अाता राज्याकडे १७-१८ लाख क्विंटल तूरडाळ उपलब्ध होईल. खुल्या बाजारातही या तूरडाळीची विक्री होऊ शकते.यासाठी सरकार एखादा ब्रँडनेम तयार करण्याचा विचार करत आहे.

 

- विक्रमी उत्पादनानंतर सरकारने ५०५० रुपये हमी भावाने १,२६३ कोटींची २५ लाख २५ हजार क्विंटल तूर खरेदी केली.  
- यामुळे सरकारकडे मोठ्या प्रमाणावर तूर जमा झाली. ती परराज्यात विकण्याचा प्रयत्न तेथील लाॅबीमुळे फोल ठरला.
- त्यामुळे सरकारने तुरीची भरडई व डाळीसाठी निविदा मागवल्या. 
- १०० किलो तुरीमागे ६५ किलो तूरडाळ देणाऱ्या कंपनीची निविदा मंजूर झाली आहे.
- २५ लाख क्विंटल तूर भरडईनंतर  सरकारकडे १८ लाख क्विंटल डाळ येईल. ८ लाख क्विंटल सरकारी विभाग व १० लाख क्विंटल डाळ रेशन दुकानांत विकली जाईल. 


विभागांनाही पुरवठा
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एक किलोच्या पॅकिंगसाठी ८० रुपये, तर ५० किलोच्या पॅकिंगसाठी ३,७५० रुपये दराने तूरडाळीचा पुरवठा करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. 


यंत्रमागधारक व्याजदरात ५% सवलत 
साध्या यंत्रमागधारकांनी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरात ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील ८५% यंत्रमागधारकांना याचा लाभ होईल.


मातृवंदना योजना राज्यभरात झाली लागू
माता व बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्राची पंतप्रधान मातृवंदना योजना राज्यात राबवली जाईल. ही योजना पहिल्याच अपत्यासाठी अाहे. पाच हजार रुपये तीन टप्प्यात संबंधित लाभार्थीच्या खात्यात जमा हाेतील.


विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, परीक्षा फी खात्यात
२०१७- १८ पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्कासाठी देण्यात येणाऱ्या ५० टक्के रकमेपैकी ६० टक्के रक्कम व निर्वाहभत्त्याची सर्व रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होईल.

बातम्या आणखी आहेत...