आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वर्षा’ व ‘देवगिरी’मधील खानपानाचे टेंडर एक कोटीचेच; खडसेंचा होमवर्क कच्चा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ शासकीय निवासस्थान व उपमुख्यमंत्र्यांचे ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थान येथील खानपानसेवेच्या निविदेची रक्कम शंभर कोटी रुपये नसून एक कोटी रुपये आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात मुद्रणदोषामुळे 1.00 कोटी याऐवजी 100 कोटी असे प्रसिद्ध झाले आहे. ही निविदा प्रसिद्ध होताच राज्यातील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी मात्र कोणताही गृहपाठ न करता सरकारला धारेवर धरले. मात्र, सरकारने याबाबत खुलासा केल्यानंतर खडसेंची मात्र बोलती बंद झाली आहे. तसेच ही निविदा 100 कोटींची नसून केवळ 1 कोटींचीच असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयानेही स्पष्ट केले आहे.

‘वर्षा’ व ‘देवगिरी’ येथे 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2014 या कालावधीत वेळोवेळी खाद्यपदार्थ पुरविण्याचे कंत्राट देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने परवानाधारक खाद्यपुरवठादारांकडुन ई-निविदा प्रणाली द्वारे बाब दर निविदा मागविल्या होत्या. याबाबतची संक्षिप्त जाहिरात काही मराठी व इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत एक कोटी हाच आकडा प्रसिद्ध झाला आहे. या जाहिरातीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे निविदेला प्रथम मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. मुदतवाढीची जाहिरात मराठी व इंग्रजी दैनिकात दि. 12, 13 व 14 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र ‘मिड डे’ या इंग्रजी दैनिकात मुदतवाढीच्या जाहिरातीत मुद्रणदोषामुळे 1.00 कोटी ऐवजी 100 कोटी असा चुकीचा आकडा प्रसिद्ध झाला होता. मात्र विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी कोणतीही शहानिशा न करता सरकारवर गंभीर आरोप केल्याने खडसे यांचा होमवर्क नक्कीच कच्चा असल्याचे उघड झाले आहे.