आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाने अखेर घेतला मोकळा श्वास!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुणे जिल्ह्यातील भीमा नदीकाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्याला १ जानेवारी १८१८ रोजी ब्रिटिशांनी धूळ चारली. ब्रिटिशांच्या त्या विजयी फौजेत पूर्वाश्रमीचे महार बटालियनचे ५०० सैनिक होते. या शूर बटालियनला मानवंदना देण्यासाठी १८२२ मध्ये ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभा केला. मात्र, स्तंभाच्या देखभालीसाठी नेमलेल्या कुटुंबाने स्तंभाची दहा एकर जमीन हडपली. दहा वर्षे याचा वाद चालू होता. यासंदर्भातला कायदेशीर निकाल नुकताच लागला असून ऐतिहासिक परंपरा असलेल्या विजयस्तंभाने २० वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला आहे.   

विजयस्तंभाची देखभाल व दिवाबत्तीसाठी ब्रिटिशांनी खंडोजी माळवदकर यांची नेमणूक केली होती. त्यासाठी तीन गावांत या कुटुंबास २६० एकर जमीन इनाम म्हणून दिली. विजयस्तंभाच्या १० एकरांच्या ७/१२ वर आताच्या माळवदकर कुटुंबीयांनी १९९२ च्या सुमारास आपल्या मालकीची नोंद चढवली. तसेच स्तंभाशेजारी अनेक बांधकामेही केली.   

दरवर्षी १ जानेवारीला येथे विजयोत्सव साजरा होतो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये शूर सैनिकांना मानवंदना देण्याची प्रथा चालू केली. माळवदकर कुटुंबीयांच्या अतिक्रमणाविरोधात स्थानिक पत्रकारांनी आवाज उठवला. त्यानंतर या संदर्भात कायदेशीर लढा देण्यासाठी भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती स्थापन झाली. समितीने हा प्रश्न शासनदरबारी नेला. स्तंभासंदर्भातील जुनी कागदपत्रे शोधण्यात आली. समितीची कायदेशीर नोंदणी करण्यात आली. त्यानंतर सरकारकडे पत्रव्यवहार सुरू झाला. महसूलमधील अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. त्यामध्ये अग्रभागी होते समितीचे सल्लागार सुदाम पवार (पुणे), अध्यक्ष दादाभाऊ अभंग (डोंबिवली) आणि सचिव रामदास लोखंडे (भीमा कोरेगाव). या त्रिकुटाने सतत दहा वर्षे या प्रकरणाचा पाठपुरावा केला. विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाला. पुणे-हवेली उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू झाली. माळवदकर कुटुंबीयांचा स्तंभाशेजारची दहा एकर जमिनीची सनद असल्याचा दावा खोटा ठरला. भाजप सरकारच्या काळात या कामाने वेग घेतला.   

सातबारावरील नोंदी रद्द   
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी  या प्रकरणात लक्ष घातले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात उपविभागीय अधिकाऱ्यांपुढे अंतिम सुनावणी पार पडली. त्यात ३० क्रमांकाच्या गटातील स्तंभाशेजारची ३ हेक्टर ८६ आर जी जमीन आहे, त्यावरील माळवदकर कुटुंबीयांच्या ७/१२ वरील फेरफर रद्द केल्या. स्तंभाच्या आसपासची सर्व बांधकामे पाडण्यात आली. त्यामुळे दोनशे वर्षांची परंपरा असलेला काेरेगावचा विजयस्तंभ अखेर स्वतंत्र झाला आहे. ब्रिटिश अाणि पेशव्यांच्या त्या लढाईस पुढच्या वर्षी २०० वर्षे होत आहेत. त्यानिमित्त एक जानेवारीच्या विजयोत्सवात राज्य शासन पुढाकार घेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...