आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : जलसंधारण आयुक्तालयाला मिळणार लवकरच आयुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - छोट्या जलसंधारण प्रकल्पांची कामे वेळेवर  होण्यासाठी मृदा व जलसंधारण हे नवे खाते तयार करून त्याची जबाबदारी राम शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली. एप्रिलमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तीन महिने झाले तरी या खात्याला आयुक्त मिळाला नाही. एवढेच नव्हे तर नव्यानेच तयार करण्यात आलेल्या ओबीसी खात्यात राधिका रस्तोगी यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांनीही पदभार स्वीकारण्यास नकार दिल्याने विभागाचे काम सुरू होऊ शकले नाही. या दोन्ही विभागांना आठवडाभरात नवे सचिव मिळतील, अशी माहिती राम शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.  
 
जलसंधारण विभागाचे नाव बदलून ते मृदा व जलसंधारण विभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाल्मी संस्थेच्या परिसरात आयुक्तालय एक मे पासून सुरू होणार होते. नव्या आयुक्तांची यासाठी नियुक्तीही केली जाणार होती, परंतु आयुक्त न मिळाल्याने वाल्मीचे कार्यकारी संचालक ह. का. गोसावी यांच्याकडेच तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवडीचा हा विभाग असल्याने याचे काम त्वरित सुरू होईल, अशी अपेक्षा होती.  मात्र,  ज्या विभागातील कर्मचारी वर्ग या विभागाकडे वर्ग करण्यात आले ते कर्मचारीही अजून मृद व जलसंधारण विभागात रुजू झालेले नाहीत.  
 
मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या आयुक्त पदावर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी नेमण्यात येणार होता. मात्र, त्याचा शोध अजून पूर्ण झालेला नाही. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, सध्या ह. का. गोसावी आयुक्तालयाचे काम पाहत आहेत. नवा आयुक्त नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून नव्या आयुक्तांची लवकरच नेमणूक केली जाईल. तसेच अपर आयुक्त (प्रशासन), उपआयुक्त (प्रशासन) आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी विभागाने सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीस समिती नुकतीच नेमली आहे.  
 
राम शिंदे यांच्याकडेच नव्याने तयार करण्यात आलेल्या ओबीसी मंत्रालयाचीही जबाबदारी आहे. या खात्याच्या सचिवपदी राधिका रस्तोगी यांची १५ दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली, परंतु रस्तोगी यांनी सूत्रे स्वीकारली नाहीत. या खात्याला पूर्णवेळ सचिव नसल्याने सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान सचिव दिनेश वाघमारे हेच सध्या कारभार सांभाळत आहेत.  
 
लवकरच आदेश काढू  
राम शिंदे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, मृद आणि जलसंधारण आयुक्तालयाच्या आयुक्तपदी लवकरच अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. काही नावांवर विचार सुरू असून लवकरच त्याबाबतचा आदेश काढला जाईल. तसेच काही अधिकाऱ्यांना ठराविक विभागातच काम करण्याची इच्छा असते. रस्तोगी यांनी सूत्रे स्वीकारली नसल्याने नव्या सचिवांचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री लवकरच नव्या सचिवांची नेमणूक करतील आणि विभागाचे काम सुरू होईल, असेही राम शिंदे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...