आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 1439 गावांत 1549 टँकरने पाणीपुरवठा, 168 कोटींची मदत : पतंगराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पावसाने ओढ दिल्याने राज्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. यावर तोडगा म्हणून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पुणे विभागात बैठका घेण्यात आल्या आहेत. आज घडीला राज्यातील 1439 गावांत 1549 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे टंचाईवर मात करण्यासाठी 168 कोटींची तातडीची मदत जाहीर करण्यात आली.

मदत व पुनवर्सनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी राज्यातील टंचाईसदृश परिस्थितीबाबत ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पुणे विभागीय बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना तेथील परिस्थितीविषयी अहवाल देण्यास सांगण्यात आले. या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना 168 कोटींची तातडीची मदत देण्यात आली. लवकरच विदर्भ व कोकणातील जिल्हाधिकार्‍यांच्या बैठका घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी 1 जून 2013 ला राज्यात 5600 टँकर सुरू होते. या वेळी मात्र परिस्थिती तशी बरी असल्याचा दावा पतंगरावांनी केला. यंदा जून कोरडा गेला असला तरी मागच्या वर्षीसारखे टँकर सुरू झालेले नाहीत, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट आहे. सध्याची स्थिती पाहता 15 ऑगस्टपर्यंत चारा व पाणी पुरेल, असे दिसते. मुंबई व कोकणात पाऊस आला असला तरी उर्वरित महाराष्ट्रात मात्र अजून मान्सून स्थिरावलेला नाही. पण, 8 जुलैपासून तो सर्वत्र बरसेल, असे हवामान खात्याकडून सांगितले जात असल्याचेही पतंगराव म्हणाले.
औरंगाबाद, बीडला सर्वाधिक टॅँकर
राज्यातील औरंगाबाद, बीड, नगर, सोलापूर या जिल्ह्यांत सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या जिल्ह्यात दररोज 150 च्या वर टँकरने पाणी दिले जात आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांना ताबडतोब पाणी पुरवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे, असे कदम यांनी सांगितले.

सिमेंट बंधार्‍याचा फायदा : गेल्या वर्षी दुष्काळाला सामोरे जाताना राज्य सरकारने टंचाईग्रस्त 15 तालुक्यांना प्रत्येकी 100 कोटी दिले होते. या निधीतून सिमेंट बंधार्‍याची कामे झाली. याचा फायदा होऊन पाणी जिरण्यास मोठी मदत झाल्याचा दावा कदम यांनी केला.