आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक : महिला, बालकांच्या अत्याचारांत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात बलात्कारांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला तक्रारी करण्यास पुढे आल्यामुळे संख्येत वाढ झाल्याचे म्हटले होते. परंतु राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार २०१३ च्या तुलनेत डिसेंबर २०१५ पर्यंत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ इतकाच की पोलिसांचा धाक उरलेला नाही. केवळ महिलाच नव्हे तर बालकांवरील अत्याचारांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून सगळ्यात जास्त प्रकरणे अपहरणाची आहेत. महिलांच्या अपहरणांच्या संख्येत जवळपास दुपटीने तर बालकांच्या अपहरणांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. विशेष म्हणजे हुंडाबळींच्या संख्येत मात्र बऱ्यापैकी घट झालेली आहे.
आर्थिक पाहणी अहवालात राज्य शासनाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पुरवलेल्या आकडेवारीनुसार महिलांवरील सर्व प्रकारच्या अत्याचारांमध्ये २०१३ आणि २०१४ च्या तुलनेत मोठी वाढ झालेली आहे. २०१३ मध्ये महिलांवरील बलात्काराची प्रकरणे ३०६३ होती, २०१४ मध्ये ती ३,४६८ झाली तर २०१५ मध्ये त्यात मोठी वाढ होऊन ही संख्या ४१७६ वर पोहोचली आहे.
अपहरण आणि पळवून नेण्याच्या प्रकरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झालेली आहे. २०१४ मध्ये २ हजार ४५७ प्रकरणे घडली होती तर २०१५ मध्ये हा आकडा ४ हजार ८६४ एवढ्यावर जाऊन पोहोचला आहे.
विनयभंगाच्या तक्रारींत वाढ
विनयभंगाच्या तक्रारींतही वाढ झाली असून ही संख्या २०१५ मध्ये ११,६९६ (२०१४ मध्ये १०००१) झाली आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही ४०० प्रकरणांची नोंद करण्यात आली असून २०१४ मध्ये हा आकडा २०२ होता. पती व पतीच्या नातेवाइकांकडून झालेल्या अत्याचारांच्या प्रकरणांत मात्र थोडीशी घट झाली आहे. २०१४ मध्ये ७६९६ प्रकरणे घडली होती, तर २०१५ मध्ये हा आकडा ७४३५ वर आला आहे.
६ हजारांच्या वर बालकांना पळवले
बालकांवरील अत्याचारांमध्येही गेल्या वर्षी वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१५ मध्ये गर्भातील ३१ जिवांची हत्या करण्यात आली. २०१४ मध्ये हा आकडा १२ होता. बालकांवरील बलात्कारांमध्येही वाढ झाली असून २०१५ मध्ये १९८८ प्रकरणे समोर आली. २०१४ मध्ये १७१४ प्रकरणे होती. २०१५ मध्ये ६५७६ बालकांना पळवून नेण्यात आले. विशेष म्हणजे २०१४ मध्ये हाच आकडा २६१६ होता.
बातम्या आणखी आहेत...