आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्ताराची मुंबईत खलबतं, भाजपची मित्रपक्षांसोबत बोलणी सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून यात शिवसेनेसोबतच भाजपच्या इतर मित्रपक्षांनाही प्रतिनिधित्व मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारावर राजधानी मुंबईत खलबतं सुरु झाली आहेत. याचाचा भाग म्हणून मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्याआधी चार मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवास्थानी बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार रामदास आठवले यांच्यासह मित्रपक्षांचे नेते उपस्थित आहेत.
भाजप आणि शिवसेनेचे मंत्रिपदाच्या संख्येचे जे सूत्र ठरले आहे त्यानुसारच हा विस्तार होणार आहे. यात शिवसेनेच्या वाट्याच्या रिक्त असलेल्या दोन जागा आणि भाजपच्या कोट्यातील रिक्त असलेल्या काही जागा भरल्या जातील. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना सोबत घेऊन भाजपने ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना प्रतिनिधित्व देण्यासाठी भाजप आपल्या आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करणार आहे. खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्याशी रावसाहेब दानवे यांनी प्राथमिक चर्चा केली आहे. आता रिपाई नेत्यांसमवेत बैठक सुरु आहे. रामदास आठवले यांनी आपण राज्यात परतणार नाही केंद्रातच आपल्याला मंत्रीपद द्यावे अशी मागणी केली आहे. राज्यातील आपल्या एका कार्यकर्त्याला संधी मिळावी, माझ्या कुटुंबियांतून कोणाचेही नाव पुढे केले जाणार नाही. कोणीतरी अशा मुद्दाम वावड्या पसरवित आहेत असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
खांदेपालट नाही
मंत्रिमंडळ विस्तारानिमित्त भाजपच्या विद्यमान मंत्र्यांच्या खात्यात काही बदल केला जाण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष रवसाहेब दानवे यांनी फेटाळून लावली. 25 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व मंत्र्यांना आपण मुंबईत जेवणासाठी निमंत्रित केले आहे. या वेळी सर्व मंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असेही दानवेंनी स्पष्ट केले.