आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कट "आयएसआय'चा, मदतीला "लष्कर', अंमलबजावणी सिमीची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मार्च २००६ मधील एक रात्र.. स्थळ पाकिस्तानातील बहावलपूर येथील एक आलिशान महाल. बांगलादेशमार्गे पाकिस्तानात आलेल्या भारतातील आपल्या स्लीपर सेलसोबत लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी कमांडर आझम चिमा एक बैठक घेत होता. या बैठकीनंतर काही दिवस बहावलपूरच्या जंगलात भारत आणि पाकिस्तानातील जवळपास ५० अतिरेक्यांचे एकत्रित ट्रेनिंग सुरू होते. त्यानंतर तीनच महिन्यांनी भारताच्या आर्थिक राजधानीला अर्थात मुंबईला हादरवून टाकणाऱ्या रेल्वे बॉम्बस्फोटांच्या कटाची ही पार्श्वभूमी होती.

मुंबईत ११ जुलै २००६ रोजी झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटांची योजना आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेने आखली होती. लष्कर-ए-तोयबा आणि भारतातल्या "सिमी' या संघटनेच्या मदतीने ती अमलात आणली गेली. त्यासाठी भारतातल्या फैझल अता-उर-रहमान शेख, आसिफ खान बशीर खान, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दिकी आणि कमाल अहमद अन्सारी या चार जणांनी प्रमुख भूमिका पार पाडली. हे चौघेही वेगवेगळ्या पद्धतीने आझम चिमाच्या नियमित संपर्कात होते.

या कटाचा प्रमुख सूत्रधार होता फैझल. १९७७ मध्ये मुंबईत जन्मलेल्या फैझलने आपले अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडले आणि १९९६ साली पुण्यात कपड्यांचा व्यापार सुरू केला. याचदरम्यान तो लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेच्या संपर्कात आला. तोयबाचा महाराष्ट्रातला एक प्रमुख स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्या फैझल आणि त्याचा भाऊ राहील यांनी १९९६ ते २००४ या कालावधीत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून तब्बल पन्नास जण पाकिस्तानात अतिरेकी प्रशिक्षणासाठी पाठवल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे.

बशीर खान दुसरा प्रमुख सूत्रधार
या कटातील दुसरा प्रमुख दोषी म्हणजे आसिफ खान बशीर खान. १९९९ पासून तो सिमीचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून पोलिस रेकॉर्डमध्ये नोंद आहे. बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि साहित्य पुरवण्यात आसिफची मुख्य भूमिका असल्याचे एटीएसचे म्हणणे आहे. आणखी एक प्रमुख आरोपी म्हणजे एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी. २००१ मध्ये भारत सरकारने बंदी घातलेल्या सिमीचा माजी मुंबई सचिव असलेला एहतेशाम हा एप्रिल २००४ पासून लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात होता. तेहरानमार्गे पाकिस्तानात अतिरेकी प्रशिक्षणासाठी तरुण पाठवणे ही एहतेशामची मुख्य जबाबदारी होती. मीरारोड स्टेशनमध्ये फुटलेला बॉम्ब यानेच ठेवला होता. याशिवाय पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांना मुंब्रा येथे लपवून ठेवणे, स्फोटासाठी रेल्वे मार्गाची रेकी करणे, कटाच्या प्रमुख बैठकांमध्ये सहभागी होणे असे अनेक आरोप त्याच्यावर होते.

या कटाचा चौथा सुत्रधार म्हणजे कमाल अहमद मोहम्मद वकिल अन्सारी. बिहारचा रहिवासी असलेला कमाल खेळण्यांच्या विक्रीचा उद्योग करत असे. तो २००० पासून थेट आझम चिमा याच्या संपर्कात होता. अनेकदा तो पाकिस्तानात जाऊन अतिरेकी प्रशिक्षण घेऊन आल्याचा एटीएसचा दावा आहे. २००२ मध्ये दिल्ली येथे सापडलेल्या शस्त्रास्त्रांच्या एका मोठ्या साठ्याच्या तपास प्रकरणात त्याची चौकशी करण्यात आली होती. कमाल अन्सारी हा २००६ रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणात पहिल्यांदा अटक झालेला आरोपी होता. पाकमधून आलेल्या ११ अतिरेक्यांपैकी दोन अतिरेकी कमाल यानेच नेपाळ सीमापार करून भारतात आणले होते. तसेच बॉम्बस्फोटासाठी वापरलेल्या आरडीएक्समधील उर्वरित साठा अटकेनंतर त्याच्या घराच्या झडतीत सापडला होता.
हवालामार्फत पैसा
रिझवान डावरे याच्यामार्फत फैझलला भारतात अतिरेकी कारवायांसाठी पाकमधून हवालामार्गे पैसा येई. गुप्तचरांची माहिती व एटीएसच्या तपासातील मुद्द्यांनुसार आझम चिमा, फैझल शेख, अासिफ खान बशीर खान या तिघांनी मिळून १९९९ मध्येच मुंबईतल्या या स्फोटांची योजना आखली होती. अखेर फेब्रुवारी २००६ ते जुलै २००६ दरम्यान आराखडा तयार झाला. भाऊ मुजम्मील शेख, डॉ. तन्वीर अन्सारी, जमीर शेख आणि सोहेल शेख यांनाही फैझलनेच कटात सहभागी केले.११ अतिरेक्यांच्या मुंबईतील निवासाची सोयही या टोळक्यानेच लावली.