मुंबई- प्रत्येकच वाहनधारकाचा कधी ना कधी वाहतूक पाेलिसांशी संबंध येताेच. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिस अनेकदा दंड वसूल करतात, तर अनेकदा चिरीमिरी घेऊन नियम धाब्यावर बसवणाऱ्याला साेडले जाते, अशाही तक्रारी येत असतात. परंतु आता हे सर्व प्रकार बंद होणार आहेत. येत्या जुलै महिन्यापासून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसुलीसाठी मुंबईत ई-चालान पद्धत सुरू केली जाणार अाहे. नंतर टप्प्याटप्प्याने ती राज्यभर लागू केली जाईल. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाव छापण्याच्या अटीवर वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्यांकडून पोलिस दंड वसूल करतात. मात्र यापैकी फारच कमी रक्कम शासकीय तिजाेरीत जमा हाेते. बहुतांश प्रकरणांत चिरीमिरी घेऊन प्रकरण ‘सेटल’ करण्यावरच पाेलिसांचा वाहनचालकांचाही भर असताे. हा भ्रष्टाचार टाळण्यासाठी वसूल हाेणारा शंभर टक्के दंड सरकारी तिजाेरीत जमा व्हावा यासाठी अाता ई-चालान पद्धती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. याबाबतचा अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर ई-चालान सुविधा पुरवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या. यामध्ये व्हीआयपीएल कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. आता हा संपूर्ण अहवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून लवकरच त्यांची मंजुरी मिळण्याची अाशा अाहे.’
डेबिट-क्रेडिट कार्डचा वापररोखीने दंड भरण्याऐवजी क्रेडिट वा डेबिट कार्डाने दंडाची रक्कम भरावी लागेल. यासाठी वाहतूक पोलिसाकडे एक स्वाइप मशीन देण्यात येईल. महाराष्ट्रातील चालकाकडे कार्ड नसल्यास त्याला १५ दिवसांत ऑनलाइन पद्धतीनेच पैसे भरण्यासाठी मुदत दिली जाईल. तर राज्याबाहेरील वाहनांकडेही असे कार्ड नसल्यास राेखीने पैसे भरण्याची सोय असलेल्या चौकीवर जाऊन पैसे भरावे लागणार आहेत.
९.५० रुपये जादा अाकारणी
या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीतून पैसे जाणार नाहीत. तसेच वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्यांवर, करदात्यांवरही याचा भार पडणार नाही. यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा खर्च संबंधित कंपनीच करणार अाहे. वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून वाहतूक नियमाप्रमाणे दंडाशिवाय रुपये ५० पैसे जादा आकारले जातील. ही जादा रक्कम व्हीआयपीएल कंपनीला दिली जाणार आहे. यातूनच कंपनी आपला खर्च वसूल करेल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.