मुंबई - मुंबई पोलिस आयुक्तांच्या नियुक्तीचा घोळ नऊ दिवसांपासून सुरू आहे. यापदासाठी शर्यतीत असलेल्या सर्व अधिका-यांमधील वरिष्ठ विजय कांबळे यांची या पदावर निवड होण्याची शक्यता आहे. सोमवारी आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर कांबळे यांच्या नावाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आयुक्तपदावर आपल्या मर्जीतील अधिकारी असावा, यासाठी काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. महामार्ग पोलिस दलाचे प्रमुख विजय कांबळे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक जावेद अहमद आणि एटीएसचे प्रमुख राकेश मारिया या तिघांत या पदासाठी चुरस आहे. यापैकी विजय कांबळे हे काँगे्रसला हवे आहेत, तर राष्ट्रवादीची पहिली पसंती आहे ती राकेश मारिया यांना अहमद यांना महासंचालकपद देऊन त्यांना शर्यतीतून बाद केले जाऊ शकते. अहमद हे गेल्या आठ महिन्यांपासून पदोन्नतीपासून वंचित आहेत आणि होमगार्ड व सिक्युरिटी कॉर्पोरेशनपदावरील महासंचालकपदाच्या दोन जागा रिक्त असल्यामुळे यापैकी एका जागेवर अहमद यांची नियुक्ती केली जाईल.
आयपीएस अधिका-यांच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असले तरी यासंबंधीचे प्रस्ताव तयार करताना आस्थापना मंडळ व गृहमंत्र्यांचे मत विचारात घेतले जाते.
मारियांपेक्षा कांबळेंचे पारडे जड
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयितांनी गुन्हा कबूल करण्यासाठी राकेश मारिया यांनी आपल्याला पैशाचे आमिष दाखवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मारिया हे वादग्रस्त ठरले होते. तसेच मारिया हे पोलिस आयुक्त झाल्यास राष्ट्रवादीसाठी ते प्राधान्याने काम करतील, अशी भीती मुख्यमंत्र्यांना असल्यामुळे आपली सर्व ताकद ते कांबळेच्या मागे उभी करतील, अशी शक्यता आहे.
आर्थिक गणित
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा पोलिस आयुक्त मर्जीतील असावा असा काँग्रेस - राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. यामागे आर्थिक गणिते असल्याचेही बोलले जाते. मुंबई आर्थिक राजधानी असल्याने पक्षांसाठी येथूनच भरघोस आर्थिक मदत मिळते. त्यामुळे येथील पोलिस आयुक्तपद महत्त्वाचे आहे.