आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nikhil Wagle Say, Sanatan's Growth Is A Congress Rashtravadi Congress Sin

सनातन संस्थेची वाढ हे तर काँग्रेस - राष्ट्रवादीचे पाप, निखिल वागळेंचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘काँग्रेस- राष्ट्रवादीने धर्मनिरपेक्षपणे राज्याचा कारभार हाकला नाही. गांधी, नेहरू यांच्या नावा वापर त्यांनी वारसा सांगण्यापुरता केला. गांधी, नेहरुंवर काँग्रेसवाल्यांची खरोखरच श्रद्धा असती तर सनातनसारख्या विषारी प्रचार करणाऱ्या संस्थेच्या वेळीच मुसक्या आवळल्या असत्या. अशा संस्था फोफावण्यास काँग्रेस, राष्ट्रवादीच जबाबदार आहे,’ असा अाराेप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला.

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी मुंबईतील कर्नाटक संघात पत्रकार प्रतिमा जोशी व कादंबरीकार, कवी भीमसेन देठे यांना पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाच हजार रुपये रोख, शाल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमात वागळे बोलत होते. ‘गोवा, ठाणे, नवी मुंबई, पुणे, मालेगावातील बॉम्बस्फोटात सनातन संस्थेचा हात होत. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने कठोर कारवाई करण्याचे टाळले. त्याचवेळी पोलिसांनी सनातनच्या आश्रमावर छापे टाकले असते तर मोहसिन शेख, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे बळी गेले नसते,’ असा दावाही वागळेंनी केला. सनातनला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशा सर्वपक्षीयांकडून आर्थिक मदत होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी सतीश काळसेकर होते. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी प्रास्ताविक केले. दया पवार यांच्या गाजलेल्या ‘बलुतं’ या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद करणाऱ्या जेरी पिंटो यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वैभव छाया यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर रंगवेधच्या विद्यार्थ्यांनी दया पवार यांच्या निवडक कविता सादर केल्या.
लेखक- कवींनी दणकून बोलले पाहिजे - जोशी : धमक्या येण्याच्या काळात लेखक, कवींनी दणकून बोललं पाहिजे, असे आवाहन पत्रकार प्रतिमा जाेशी यांनी केले. अतिरेकी संघटनाविरुद्धची लढाई एकट्या-दुकट्याची नाही तर संपूर्ण समाजाची असल्याचेही त्या म्हणाल्या. सनातन संस्था ही देशद्रोही, अतिरेकी संघटना आहे. त्यामुळे या संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांच्यासुद्धा मुसक्या आवळण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. तर देशातील वातावरण असहिष्णु बनले आहे, त्याला एकटा काँग्रेस पक्ष जबाबदार नाही. डाव्या पक्षांसह समाजवादी व इतर समविचारी पक्ष, संघटनांही काँग्रेस इतक्याच जबाबदार आहेत, असे काळसेकर म्हणाले.

पोलिसच भीती घालतात
ज्या पोलिसांनी संरक्षण करायचे, तेच पोलिस लेखक, कवी, पत्रकार यांना ‘जरा सांभाळून राहा’, असा इशारा देत आहेत. पोलिस माझे संरक्षण करू शकत नाहीत, अशी खात्री झाल्याने आपण संरक्षण नाकारल्याचे वागळे यांनी सांगितले.