आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा देऊ, राणेंचा प्रचार करणार नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेच्या विनाक राऊत यांच्या रूपात कडवे आव्हान उभे ठाकल्याने आणि जैतापूर अणू प्रकल्पामुळे शेतकरी-मच्छिमारांच्या रोषास कारणीभूत ठरलेले रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नीलेश राणे यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगी राजीनामा देऊन पण राणेंचा प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतल्याने राणे अडचणीत आले आहेत.

नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नीलेश यांच्या वर्तणुकीमुळे कोकणातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. रत्नागिरी मतदारसंघातील काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निलेश राणे यांचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. यावर रत्नागिरीचे आमदार व पालकमंत्री उदय सामंत यांनी निलंबनाचा इशारा दिल्यानंतर हे प्रकरण आणखी तापले आणि ‘प्रसंगी राजीनामा देऊ, पण राणेंचा प्रचार करणार नाही’ अशी धमकीच कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिली.

‘राणे पितापुत्रांनी गेल्या पाच वर्षांत आम्हाला दिलेली अपमानास्पद वागणूक आम्ही विसरलेलो नाही. आता निवडणूक आल्यावर आमची आठवण झाली का?,’ असा रोकडा सवालही राष्ट्रवादीने विचारला आहे.

केसरकर परदेशात जाण्याच्या विचारात
राष्ट्रवादीचे सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर व राणे यांच्यातून विस्तवही जात नाही. राणे आपल्याला कस्पटासमान वागणूक देत असल्याचे केसरकरांनी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले होते. पण, काही उपयोग झाला नाही. मध्यंतरी ते शिवसेनेच्याही संपर्कातही होते. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच दिसत नाहीत. प्रचार रंगात येत असताना ते परदेशात जाण्याचा विचार करत आहेत.