आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nilesh Rane\'s Troubles Mount As Congress, NCP Workers News In Divya Marathi

कार्यकर्त्यांनी राणेंवरचा राग शरद पवारांवर काढला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई झालेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील राडा आता टोकाला पोहोचला आहे. शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतरही हा वाद संपण्याचे नाव घेत नसून आता रविवारी सावंतवाडीत होणार्‍या पवारांच्या सभेलाही न जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

सावंतवाडीत रविवारी शरद पवारांची सभा होत आहे. या सभेला न जाण्याचा आणि कुठल्याही परिस्थितीत राणेंचे चिरंजीव नीलेश राणेंचा प्रचार न करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीने शनिवारी घेतला.

सावंतवाडीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे व आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राणेंच्या प्रचारात सहभागी व्हा, अशा सूचना शुक्रवारी केसरकर यांना पवारांनी दिल्या होत्या. मात्र, आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ, असे केसरकर म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी बैठक घेतली. मात्र, कार्यकर्त्यांनी आपला विरोध कायम असल्याचे सांगत पवारांच्या सभेलाही न जाण्याचा निर्णय घेतल्याने राणे व सिंधुदुर्ग राष्ट्रवादीमधील राडा टोकावर पोहोचला आहे, हे उघड झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची शुक्रवारी कणकवली येथे सभा झाली. या सभेला राष्ट्रवादीचे मोजून चार कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांचे स्वागत करायलाच हे चार कार्यकर्ते सभेला होते. काँग्रेस कार्यकर्त्यांची सभेला तुरळक उपस्थित असल्याने अजित पवारांबरोबर या सभेला उपस्थित असलेल्या नारायण राणेंनाही जिल्हय़ातील प्रचंड असंतोष बघायला मिळाला.

समन्वय समितीच्या बैठकीत हमरीतुमरी
राडा संपवण्यासाठी सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरी जिल्हय़ातही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची समन्वय समितीची बैठक शनिवारी बोलावली होती. मात्र, काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने राष्ट्रवादी पार्टीला उद्देशून वक्तव्य केल्याने बैठकीत हमरीतुमरी झाली आणि शेवटी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी ही बैठक अध्र्यातूनच सोडून दिली. मंत्री उदय सामंत यांनी या जिल्हय़ात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या नाकदुर्‍या काढल्या होत्या. पण काँग्रेसच्या दादागिरीमुळे यावर पाणी फेरले आहे.