आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari And Raj Thackarey Meeting News In Marathi, MNS

शिवसेनेला रोखण्यासाठी गडकरींचे ‘राज’कारण !, गुप्त भेटींने खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजप नेते नितीन गडकरी यांनी सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याची बातमी आली आणि राजकीय गोटात खळबळ उडाली. सुरुवातीला ही केवळ चर्चाच असल्याचे भासवून भाजपने या दोन नेत्यांच्या भेटीचे वृत्त नाकारले. मात्र, नंतर गडकरी यांनी स्वत:च भेटीला दुजोरा देत ‘मनसे’ सोबत आला तर महायुतीला फायदाच होईल, असे जाहीरपणे सांगितले. या अनपेक्षित घडामोडींत ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या भेटीगाठीचा मुख्य लाभ मात्र फक्त भाजपलाच होणार आहे.


गडकरींनी फक्त राज यांच्या भेटीचे सर्मथनच केले असे नव्हे तर गेल्या वेळी राजू शेट्टी व रामदास आठवले सोबत नसल्यामुळे युतीला फटका बसला होता. आता तेच घडू नये म्हणून आपण राज यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले.


शिवसेनेच्या हाती शून्यच!
महायुतीतील मुख्य पक्ष असलेल्या शिवसेनेला या भेटीतून काडीमात्र लाभ नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेचा बाहेरून पाठिंबा घ्यायचा याचा अर्थच भाजपचे जेथे उमदेवार असतील तेथे मनसेने आपली सर्व ताकद पणाला लावायची. मात्र, ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असतील तेथे मात्र त्यांना पाठिंबा द्यायचा नाही, अशी ही व्यूहरचना असल्याचे बोलले जाते. गडकरींचे राजकारण शरद पवार यांच्यासारखे आहे. त्यांचा सर्वच पक्षात वावर असतो. त्यामुळे एनडीएमध्ये शरद पवार यांना आणण्यासाठी जसे ते प्रयत्न करत आहेत, तसेच राज यांच्याशीही ते मैत्रीपूर्ण संबंध ठेवून बेरजेचे राजकारण करत आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. सोमवारी गडकरींची राज यांच्यासोबत झालेली अडीच तास बैठक हे याच संबंधांचा एक भाग आहे. दिल्लीत कमळ फुलवण्यासाठी भाजप आपले सर्व पत्ते ओपन करत असून महाराष्ट्रातून त्यांना जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. मागच्या खेपेस त्यांचे 9 खासदार होते. ही संख्या 15 वर न्यायची आहे. पण, त्यात मनसे आड येऊ शकते, हे मोदी व गडकरींना ठाऊक आहे.


मोदींसाठी राज तटस्थ
2009 च्या निवडणुकीत मुंबई, पुणे, नाशिक व ठाणे अशा ठिकाणी मनसेने भाजप व शिवसेनेला फटका दिला होता. मुंबईत तर सहाही ठिकाणी युतीच्या उमेदवारांना अवघ्या काही हजारांच्या मताने पराभव पत्करावा लागला होता. मनसेच्या उमदेवारांनी दीड लाखावर मते मिळवली होती. मुळात नरेंद्र मोदी व राज यांचेही चांगले संबंध आहेत. मोदी पंतप्रधान व्हावेत, ही राज यांचीही इच्छा आहे. म्हणूनच लोकसभा तोंडावर असतानाही मनसे निवडणुकीची काहीच तयारी करत नसल्याने ते मोदींसाठी तटस्थ राहण्याचा डाव खेळत असल्याचे उघड दिसते. गडकरींची राज भेट ही त्याचाच एक भाग आहे.

भाजपची खेळी
मागील लोकसभेत शिवसेनेला 11 जागा मिळाल्या होत्या. यावेळी रामदास आठवले, राजू शेट्टी व महादेव जानकरही महायुतीत आल्यामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढेल, असा अंदाज आहे. मात्र शिवसेनेला महायुतीत सर्वाधिक जागा मिळाल्यास ते एनडीए सरकारमध्ये जास्त मंत्रिपदे तर मागतीलच, पण येणार्‍या विधानसभेतही लोकसभेतील यशाच्या जोरावर ते जास्तीचे मतदारसंघ मागतील. परिणामी मुख्यमंत्रीही शिवसेनेचा असेल आणि हेच भाजपला नको आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या मागे फरफटत आम्ही गेलो, आता तुम्ही आमच्या मागे या आणि आम्ही सांगतो ते तुम्हाला ऐकायला लागेल, असे भाजपचे पुढचे धोरण असेल.

उद्धव ठाकरे व राज यांचे संबंध पाहता हे दोघेजण भविष्यात उघडपणे एकत्र येण्याची शक्यता नाही. शिवाय राज बाहेरून पाठिंबा देण्याच्या नावावर शिवसेनेच्या विरोधातील उमेदवारांना ताकद देतील, असे बोलले जाते. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमदेवार जिंकून येण्यासाठी ते मदत करतील. तसे झाल्यास भविष्याचा विचार करता भाजप, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस अशीही आघाडी होऊ शकते. लोकसभेतील रागरंग बघून शरद पवार अशी आघाडी करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. कारण सत्तेशिवाय ते आणि त्यांचा राष्‍ट्रवादी पक्ष राहू शकत नाही, हे सत्य आहे.


मुंडें-उद्धव संबंधांना ठेच!
गडकरी यांची राजभेट म्हणजे मुंडे-उद्धव यांच्यामधील सुमधूर संबंधांना ठेच पोहचवण्याचा प्रयत्न आहे. भाजपात गडकरी व मुंडे असे दोन गट आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंडे सतत उद्धव यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. मात्र बाळासाहेबांशी चांगले संबंध असणारे गडकरींचे शिवसेनेशी नाते त्यानंतर कमी होत गेले. यामागे राज ठाकरे यांच्याशी त्यांची असलेली मैत्रही कारणीभूत असल्याचे बोलले जाते.


अशी झाली भेट
एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज-गडकरी भेटीदरम्यान मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. आधी या भेटीचा भाजपने इन्कार केला. मात्र, स्वत: गडकरी यांनीच भेट झाल्याचे मान्य करत ‘मनसे’ सोबत आला तर महायुतीला फायदाच होईल, असे जाहीरपणे सांगितले. मनसे म्हणजे काही पाकिस्तान नाही, काँग्रेसला घालवण्यासाठी ही चर्चा झाल्याचे गडकरी म्हणाले.