आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईचे कायदे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रोड ट्रॅफिक ऑफिसरच्या (आरटीओ) कचाट्यातून देशातील वाहनचालकांची सुटका करण्याबरोबरच बेदरकारपणे वाहन चालवणार्‍यांना चाप लावण्यासाठी लवकरच कठोर कायदे करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व बंदरमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी मुंबईत एका कार्यक्रमात दिली.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या ‘मुद्देसूद’ या विधिमंडळातील भाषणांच्या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार पूनम महाजन यांची या वेळी उपस्थिती होती.

गडकरी म्हणाले, देशातील सर्वच शहरांतील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून तीन वेळा वाहतुकीचे उल्लंघन करणार्‍यांचा वाहतूक परवाना कायमचा रद्द केला जाईल, असे नियोजन तयार होत असल्याचे ते म्हणाले. देशातील खासकरून राज्यातील साखर कारखान्यांना ऊर्जा मिळण्यासाठी इथेनॉल मिश्रणाची टक्केवारी वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. मेट्रो शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बसचा नवा पर्याय अमलात आणण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी जल वाहतुकीला प्राधान्य देण्याचा केंद्राचा विचार असून त्यासाठी खासगी जेडी बांधणार्‍यांना पाच वर्षे कुठलाही कर न आकारण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. नवीमुंबई विमानतळाची फाइल गेली सहा महिने धूळखात पडून होती. ती आपण पदभार स्वीकारल्यानंतर एका मिनिटात निकाली काढली. काँग्रेस सरकारच्या समित्या, उपसमित्या, अहवाल, संशोधन अहवाल अशा वेळखाऊ कार्यपद्धतीवर त्यांनी या वेळी टीका केली.

ब्रिक्स मुंबईत
मुंबई देशाचा आत्मा आहे. जगात भारताची ओळख आहे. त्यामुळे ब्रिक्स या जागतिक बँकेचे कार्यालय मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करू, असे गडकरी म्हणाले.

पैशाची अजिबात वानवा नाही
युरोपियन देशात पैसे ठेवण्यासाठी बँका कर आकारतात. तो पैसा भारतात 3 टक्के व्याजाने आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. पायाभूत सुविधांमध्ये हा पैसा वापरण्याचा विचार असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.

शिवसेनेला टोला
मुंबई शहर अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. शहराची सुधारणा करण्यासाठी जात, भाषा, प्रांत, धर्म असे राजकारण न करता मुंबईच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष शिवसेनेला टोला हाणला.