आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 नदीजोड प्रकल्पांसाठी 55 हजार कोटी, सिंचनाची क्षमता 40%पर्यंत नेणार; गडकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सिंचनाच्यादृष्टीने महाराष्ट्र सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून सिंचन क्षमता ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात दोन नदीजोड प्रकल्प राबवण्यात येतील. दमनगंगा-पिंजाळ तसेच नार-तापी-नर्मदा या नदीजोड प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून ५५ हजार कोटी दिले जातील, अशी घोषणा केंद्रीय जलसंधारण वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली. 

वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत गडकरी यांनी सिंचन प्रकल्प तसेच रस्ते प्रकल्पांचा आढावा घेतला. यानंतर गडकरींनी मुख्यमंत्र्यांसह प्रसार माध्यमांशी संवाद साधला. देशभरात पाच नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. त्यातील दोन प्रकल्प हे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये राबवण्यात येणार आहेत. नार-तापी-नर्मदा प्रकल्प हा गुजरात-महाराष्ट्र यांच्यातील करारात अडकला होता. त्यावरही तोडगा निघाला आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी महाराष्ट्राकडून हजार कोटी, तर गुजरातकडून हजार कोटी देण्यात येणार आहेत. उर्वरित १८ हजार कोटी हे केंद्र सरकारकडून देण्यात येतील. त्याचप्रमाणे दमनगंगा-पिंजाळ प्रकल्पासाठीही केंद्राकडून निधी देण्यात येणार असून या प्रकल्पांसाठी एकूण ५५ हजार कोटींचा निधी केंद्राकडून देण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. सिंचनासाठी केंद्राकडून नदी, नाले रुंदीकरण, बंधाऱ्यांचे बांधकाम, कालव्यांची निर्मिती त्याचप्रमाणे कालव्यांऐवजी थेट पाइपलाइनने ड्रिपिंग पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गडकरी म्हणाले.
 
राज्यात अपूर्ण अवस्थेत असलेले २६ सिंचन प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत. या प्रकल्पांसाठी १००० कोटींचा निधीही केंद्राकडून देण्यात येणार आहे. 

रस्त्यांसाठी ३० हजार कोटी
रस्त्यांच्याबाबतदेखील आता आम्ही चांगले नियोजन केले आहे. सरळ कंत्राटदाराच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. २४ तासांच्या आत हे पैसे जमा झाले पाहिजेत. अशी व्यवस्था केल्याने काम जलद गतीने होईल. कॉस्ट ऑप मटेरियल कसे कमी होऊ शकते यावर विचार सुरू आहे. या विषयाला जोडून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात १० हजार किलोमीटर रस्त्यांसाठी ३० हजार कोटींचे हे टेंडर असून येत्या तीन वर्षांत राज्यातील सगळे रस्ते व्यवस्थित होतील. 

सिंचन गैरव्यवहारांची चौकशी सुरू : मुख्यमंत्री 
या वेळी महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांच्या चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणांची चौकशी सुरू असून प्रकरणांत आरोपपत्र दाखल केले असल्याचे सांगितले. एका-एका प्रकरणाची चार्जशीट ही ३०-३० हजार पानांची असल्याने वेळ लागत आहे. नि:पक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. 

मुंबईतील रस्त्यांवरून उद्धव ठाकरेंना टोला 
आपल्याकाळात उत्तम रस्ते झाल्याचे सांगत मुंबईतदेखील त्या प्रकारचे रस्ते होऊ शकतात. मात्र, दुर्दैवाने माझ्याकडे मुंबईतील कुठलाच रस्ता नाही, असे सांगताना गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अप्रत्यक्ष टोला लगावला. माझे उद्धव यांच्यासोबत दोन-तीन वेळा बोलणे झाले, मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगत त्यांनी मदत मागितली तर मी निश्चितपणे मदत देईन, असे गडकरी म्हणाले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...