आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari Sideline In A Amit Shah\'s New BJP Team

मोदी-शहा जोडगळीचा गडकरींना शह, नव्या टीममधून समर्थकांना डावलले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सकाळी आपल्या नव्या टीमची घोषणा केली. शहा-मोदी जोडगळीने मंत्री नितीन गडकरी यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याचे नव्या टीमवरून दिसून येत आहे. गडकरींच्या समर्थक व औरंगाबादच्या माजी महापौर विजया रहाटकर यांना महिला मोर्चाचे अध्यक्षपद दिले आहे. मात्र, विनोद तावडे किंवा सुधीर मुनगुंटीवर यांच्यापैकी एकाला सरचिटणीसपद मिळावे यासाठी प्रयत्नशील असणा-या गडकरींची 'इच्छापूर्ती' केलेली नाही. संघाच्या मुशीतील राज्यातील नेते विनय सहस्त्रबुद्धे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लावली आहे तर, श्याम जाजू व पूनम महाजन यांना सचिवपदी स्थान दिल्याने 'मुंडे' गटालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.
अमित शहा यांची मागील महिन्यात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे शहा आपल्या टीममध्ये कोणाकोणाला स्थान देतात याकडे भाजपमधील मंडळींचे लक्ष होते. अखेर अमित शहा यांनी आपली नवीन कार्यकारिणी आज जाहीर केली. यात अमित शहा यांनी अत्यंत काळजीपूर्वक टीम निवडल्याचे दिसून येत आहे. कोणीही वरचढ ठरणार नाही याची खबरदारी घेताना सर्वांना सोबत घेण्याचे कसबही दाखविले आहे. महाराष्ट्राचा विचार करता मोदी-शहा यांना भविष्यात आव्हान देण्याची क्षमता असलेल्या नितीन गडकरींना शह देण्याचा प्रयत्न या जोडीने केला आहे. संघाची गडकरींवर विशेष कृपा असल्याने संघातील काही बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचून गडकरी व नागपूरचा गड डोईजड होणार नाही याची दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी मोदींचे चांगले संबंध आहेत. मात्र, भागवत यांचे गडकरीप्रेम लपून राहिलेले नाही. त्यामुळेच मोदी-शहा यांनी मध्यप्रदेशातील संघाचे बडे नेते राम माधव यांना सरचिटणीसपदी बसवले आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील संघाचे नेते विनय सहस्त्रबुद्धे यांची उपाध्यक्षपदी निवड करून नागपूरकरांना धक्का दिला आहे.
श्याम जाजू व पूनम महाजन यांना स्थान देतानाच राज्यातील गडकरींचे समर्थक बाजूला कसे राहतील याची काळजी घेतली गेली आहे. श्याम जाजू यांना दिवंगत प्रमोद महाजन यांनी दिल्ली दरबारी नेले होते. ते मागील अनेक वर्षे पक्षाच्या कार्यालयात महत्त्वाच्या जबाबदा-या संभाळत होते. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मोदींची चांगलीच बाजू लावून धरली होती. त्यामुळे शहांनी त्यांना संधी दिली आहे. विदर्भातून सुधीर मुनगुंटीवर यांना स्थान मिळावे तर पश्चिम महाराष्ट्रातून विनोद तावडेंना पक्षसंघटनेत स्थान मिळावे अशी गडकरींची इच्छा होती. मात्र, फडणवीस यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी या दोघांचाही पत्ता कट केल्याचे दिसून येत आहे. फडणवीस हे गडकरीविरोधक समजले जातात. तसेच शहा यांनी फडणवीस यांना मोकळीक दिल्याची चर्चा सध्या आहे. पंकजा मुंडेंना केंद्रात मंत्रिपद देण्याचे संकेत मोदी-शहाकडून मिळत आहेत त्यामुळे त्यांची पक्षसंघटनेत कोठेही वर्णी लागली नसल्याचे दिसत आहे. मात्र, गडकरींनी आणखी एक शिफारस केलेल्या नावाला शहा यांची पसंती दिली आहे. औरंगाबादच्या माजी महापौर विजया रहाटकर यांना राष्ट्रीय महिला मोर्चाचे अध्यक्षपद देऊन हवी तशी बोळवण करण्यात आली आहे.