आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar To Take Oath As Bihar Chief Minister, Shivsena Leaders Attaind Events

भाजपला शह: नितीशकुमारांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे दूत पाठविणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या 20 नोव्हेंबरला होणा-या शपथविधी सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे आपले विशेष दूत पाटण्याला धाडणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आज ही माहिती दिली आहे. नितीशकुमार यांनी येत्या शुक्रवारी होणा-या शपथविधी सोहळ्याला आपल्याला फोन करून आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण दिले आहे असे उद्धव यांनी सांगितले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, मंत्री रामदास कदम तसेच इतर नेते या सोहळ्याला हजेरी लावतील असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावून उद्धव ठाकरे हे भाजपच्या जखमेंवर मीठ चोळणार आहेत. उद्धव ठाकरे याद्वारे भाजपमधील मोदी-शहांच्या राजकारणाला शह देत असल्याची चर्चा आहे.
भाजप व शिवसेनेचे संबंध गेल्या वर्षभरापासून कमालीचे ताणले गेले आहेत. आधी केंद्रात केवळ एकच व तेही दुय्यम खाते देऊन शिवसेनेची बोळवण केली. त्यानंतर ऐनवेळी दगाफटका करीत 25 वर्षाची युती तोडली. यासोबत युतीतील मोठ्या भावाची भूमिका भाजपने शिवसेनेकडून खेचून घेतली. कमी आमदार निवडून आल्यानंतरही भाजपने शिवसेनेशिवाय सरकार स्थापन केले. दोन महिन्यानंतर भाजपने सेनेला सत्तेत घेतले खरे पण केवळ 5 व तीही दुय्यम कॅबिनेट व राज्यमंत्री देऊन अपमान केला. यानंतर भाजपने शिवसेनेची फरफट कायम ठेवत त्यांच्या मागण्या व भूमिकेकडे दुर्लक्ष केले. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा आहेत हे न कळण्याइतकी शिवसेना दुधखळी नाही. त्यामुळेच मोदींचे कट्टर विरोधक मानले जाणारे व भविष्यात मोदींना आव्हान देण्याची क्षमता बाळगून असलेल्या नितीशकुमारांच्या शपथविधीला हजेरी लावून उद्धव ठाकरे मोदी-शहांना धक्का देण्याचे काम करणार आहेत.
मोदींचे विरोधक ते आपले मित्र या उक्तीने नितीशकुमार यांनी उद्धव ठाकरेंना आग्रहाचे व प्रेमाचे निमंत्रण धाडले आहे. एवढेच नव्हे तर मोदींचे एकेकाळचे गुरु व आजचे पक्षांतर्गत विरोधक लालकृष्ण आडवाणी यांनाही नितीशकुमार यांनी निमंत्रण धाडले आहे. आडवाणी यांच्यासह खासदार शत्रू्घ्न सिन्हा नितीशकुमारांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यासोबतच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आदी नेते हजेरी लावणार आहेत. या निमित्ताने भाजपविरोधी व खासकरून मोदी विरोधकांना एकत्र आणण्याचा नितीशकुमारांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना त्यांना यश येत असल्याचे दिसून येत आहे.