आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंडा घालणा-या नायजेरियन टोळीला अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोठ्या रकमेच्या लॉटरीचे आमिष दाखवून मुंबई व परिसरातील नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालणा-या नायजेरियन टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीकडून फसवणूक झाल्याची तक्रार करणा-या 15 जणांनी पोलिसांशी यासंदर्भात संपर्क साधला आहे.
गुन्हे शाखेच्या व्यंकट पाटील व विनायक वत्स या अधिका-यांनी 31 डिसेंबर रोजी नागरिकांना गंडा घालणा-या सहा नायजेरियन तरुणांची टोळी पकडली होती. योहा जिहान, टोनी इव्हेका, आयके इनाहुरो, अमादिन जेफरी, जार्विस लवानी आणि थिओफेलिस इबेमुदिया अशी त्यांची नावे आहेत. आरे कॉलनी परिसरातून त्यांना अटक करण्यात आली होती. नवी मुंबईतील एका नागरिकाने नायजेरियन मंडळींच्या भूलथापांना बळी पडून जास्त रकमेच्या आमिषाने 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. पण, प्रत्यक्षात त्याचे सगळे पैसे बुडाले. या भामट्यांनी एका पुणेस्थित उद्योजकाला तर 75 लाख रुपयांना बुडवले होते.
चोरट्यांच्या लॅपटॉपचा पासवर्ड हस्तगत करण्यात अजून पोलिसांना यश मिळालेले नाही. न्यायवैद्यक विभागातर्फे या लॅपटॉपची तपासणी झाल्यानंतर पुढील तपासासाठी धागेदोरे मिळू शकतील. या भामट्यांनी त्यांच्याकडील बरेचसे पैसे पब आणि मौजमजेसाठी उधळले आहेत.