आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Answer For Bjp Pradesh President After Core Committee Meeting

भाजप कोअर कमिटीच्‍या बैठकीनंतरही प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतरही मंगळवारी प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा कायम राहिला. सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे आघाडीवर असली तरी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या नावावरही अधूनमधून चर्चा होत राहिली. गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी गटांच्या हेलकाव्यांनंतर अखेर कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब न करता केंद्रीय समितीकडे निर्णय सोपविण्यात आला आहे. दरम्यान, पक्षात कोणतेही गट नसून प्रदेशाध्यक्ष पक्षाचा होईल, गटाचा नाही, असे पक्षाचे संसदीय उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केले.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी मंगळवारी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांच्या निवासस्थानी कोअर समितीची बैठक झाली. या बैठकीला गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, रविंद्र भुसारी तसेच अन्य नेते उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी पांडूरंग फुंडकर आणि एकनाथ खडसे यांच्या नावावर चर्चा केली. मात्र, खडसे यांच्याकडे महत्वाचे पद असून फुंडकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा मुद्दा पुढे करण्यात आला. त्यामुळे मुंडेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला होता. तर तावडे यांनी गडकरी गटाचे खंदे समर्थक मुनगंटीवार यांच्या नावाचा आग्रह धरला होता.

मी शर्यतीत नाही : मुंडे
बैठकीत कोणत्याही नावावर एकमत न झाल्याने अखेर हा निर्णय केंद्रीय समितीकडे देण्याचे ठरले. मात्र, यासंदर्भात मुंडे यांनी सांगितले की, ही बैठक कोअर समितीची नव्हती तर केवळ अनौपचारिक चर्चा होती. प्रदेशाध्यक्षाच्या पदाच्या शर्यतीत आपण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षात मुंडे अथवा गडकरी असा कोणताही गट नसून गडकरींना विचारात घेऊनच प्रदेशाध्यक्षाची नेमणूक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील 28 जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका झाल्या असल्याचेही ते म्हणाले.

दुष्काळाचे राजकारण करू नये
दुष्काळाची स्थिती अतिशय गंभीर असून याबाबत शरद पवारांनी राजकारण करू नये. केवळ माढातच दुष्काळ असल्याचे ते भासवताहेत मात्र त्यांनी तसे करू नये. दुष्काळी भागातील जनतेसाठी आपण संघर्ष करणार असून हा सत्तेसाठी संघर्ष नसेल. राज्यात आपला पक्ष जागृती करणार असून दोन सभा झाल्या आहेत.यापुढे 125 तालुक्यांत दुष्काळ परिषदा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर घ्याव्यात, अशी मागणीही मुंडे यांनी केली.