आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये सादर केलेल्या निवेदनात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत पोलीस अधिका-यांवर कारवाईबाबतच्या मागणीवर काहीच उत्तर दिले नाही. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही गृहमंत्र्यांचे म्हणणे ग्राह्य ठरवत 6 एप्रिल रोजी पुढील सुनावणी असून साक्षीदारांना न्यायालयामध्ये हजर करण्यास सांगितले.
जाधव यांना पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी खोटा अहवाल न्यायालयात सादर केला होता. तसेच बी-समरी देत हे प्रकरण मिटवण्याचाही प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. मात्र न्यायालयाने बी-समरी फेटाळल्याने पोलिसांविरोधात 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला, तरीही एकालाही अटक न झाल्याने हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी सभागृहात या पोलिसांना बढती दिल्याचे सांगत, त्यांच्या अटकेची मागणी केली. याबाबत केलेल्या निवेदनात गृहमंत्र्यांनी पोलिसांविरोधात गुन्ह्याची दखल घेऊन शहानिशा करण्यासाठी 5 नोव्हेंबर 2012, 3 डिसेंबर 2012, 20 डिसेंबर 2012, 21 जानेवारी 2013, 1 फेब्रुवारी 2013 आणि 5 मार्च 2013 या दिवशी सुनावणी झाल्याचे सांगितले. मात्र, एकाही साक्षीदाराला या सुनावणीदरम्यान हजर न केल्याने 6 एप्रिलची तारीख सुनावणीसाठी दिल्याचे सांगितले. संबंधित पाच पोलिस अधिका-यांविरुद्ध कारवाईच्या मागणीबाबत गृहमंत्र्यांनी काहीच सांगितले नाही.
त्यावर चिडलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उच्चारलेले काही शब्द सभागृहाचा अवमान करणारे असल्याचे सांगत अध्यक्षांनी ते कामकाजातून काढून टाकले. आपण स्वत:, पोलिस आयुक्त आणि विधी सचिव यांची बैठक घेऊन या प्रश्नावर चर्चा केल्याचे ते म्हणाले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बाधा आणता येणार नाही, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. तसेच पुढील सुनावणीच्या तारखेला त्यांनी साक्षीदारांना हजर करण्यासही जाधव यांना सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.