मुंबई - भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकण्याआधी शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. त्यामुळे शिवसेनेची अडचण झाली असून उभय पक्षांत सत्तेतील वाट्यावरून अद्याप मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
फडणवीस सरकार १२ नोव्हेंबर रोजी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. त्याआधी शिवसेनेचा मंत्रिमंडळात समावेश करणार काय, असे विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आधी बहुमत सिद्ध करू आणि नंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. शिवसेनेला ‘योग्य वेळी’ सत्तेत सहभागी करून घेतले जाईल, असेही फडणवीस म्हणाले बुधवारच्या दुस-या कॅबिनेट बैठकीत राज्यपालांच्या अभिभाषणातील ८४ मुद्द्यांवर साडेतीन तास चर्चा झाली. नंतर फडणवीसांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली.
शिवसेनेचे मौन : भाजपच्या या भूमिकेवर शिवसेनेने मात्र मौन बाळगले आहे. ‘गटनेता निवडीसाठी रविवारी पक्षाच्या नूतन आमदारांची बैठक बोलावली आहे.त्याच वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाची भूमिका जाहीर करतील,’ असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई म्हणाले.
* शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न
फडणवीसांचे हायकमांडकडेच बोट
आजवर काँग्रेस दिल्लीच्या इशा-यावर नाचते असा आरोप भाजप करत आला. परंतु आता भाजपही दिल्लीच्याच इशा-यावर नाचणार असल्याचे दिसत आहे. राज्यातील मंत्रिपदांचे वाटप दिल्लीश्वरांच्या आदेशावरून झाले. शिवसेनेबाबतचा निर्णयही तेच घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला सोबत घ्यायचे का, यावर उभय नेत्यांची चर्चा सुरू आहे. याबाबतची घोषणा दिल्लीतच होईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी श्रेष्ठींकडेच बोट दाखवले.
राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रिपदे?
राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा जाहीर केल्यामुळे भाजप बिनधास्त आहे. पाठिंब्यासाठी शिवसेना अवास्तव मागण्या करीत आहे, तर राष्ट्रवादी केंद्रातील दोन मंत्रिपदांवरही खुश होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादीला केंद्रात दोन मंत्रिपदे देऊन राज्यात पाच वर्षे आरामात सत्ता उपभोगण्याचा भाजपचा इरादा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेचा रविवारचा अल्टिमेटम
सत्तेत सन्माननीय वाटा देण्याबाबत शिवसेनेने भाजपला रविवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. रविवारी शिवसेना नेत्यांची बैठक होत असून तीत भाजपने सत्तेत वाटा दिल्यास गटनेता आणि न दिल्यास विरोधी पक्षनेता निवडण्यात येणार आहे.
केंद्रात पर्रीकर, रुडी, नक्वींना संधी
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ९ नोव्हेंबरला होण्याची शक्यता असून या विस्तारात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना संरक्षणमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. या विस्तारात शिवसेनेच्या मंत्र्यांची संख्या वाढू शकते. राजीव प्रताप रुडी, मुख्तार अब्बास नक्वी, वीरेंद्र सिंग आणि एस. एस. अहलुवालिया यांनाही संधी मिळू शकते.