मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन व कलिना मध्यवर्ती ग्रंथालयाच्या बांधकामातील कथित घोटाळ्यात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना क्लीन चिट देण्यात आलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
भुजबळ यांच्या चौकशीबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्र पाठवल्याचे मी वाचले आहे; परंतु मी ते पत्र अजून पाहिले नसल्याचे फडणवीस म्हणाले. या प्रकरणात भुजबळ यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, "भुजबळ यांच्यावरील आरोपात तथ्य दिसत नाही. पुरेशी वस्तुस्थिती न तपासता कारवाई झाली तर सरकारची प्रतिमा मलिन होईल व पुढे हे आरोप टिकले नाहीत तर नाचक्की होईल' असे पत्र काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, हे पत्र मिळाले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना क्लीन चिट दिली असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.
हाउसिंग पॉलिसी लवकरच
गृहनिर्माण विभागाने हाउसिंग पॉलिसी तयार केली असून त्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. काही सूचनांनुसार या धोरणांत दुरुस्त्या करण्यात येत असून लवकरच हे धोरण मंत्रिमंडळासमोर मांडले जाणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.