आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाची चर्चा की फार्स, कोरम नसतानाही उशिरापर्यंत चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात प्रचंड दुष्काळ पडलेला आहे. १९७२ पेक्षा मोठा दुष्काळ असल्याचे सांगितले जात आहे. पाण्याचा साठा जवळ-जवळ संपुष्टात आलेला आहे. दुष्काळावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, कर्जमाफीची मागणी लावून धरली, कामकाज बंद पाडले. परंतु नियम २९३ अन्वये मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी स्थितीबद्दल विधानसभेत विरोधी पक्षाने चर्चा उपस्थित केली होती. परंतु या चर्चेला सभागृहात कोरम नसतानाही सुरुवात करण्यात आली. यातही विरोधकांची संख्या सत्ताधाऱ्यांपेक्षा कमीच होती. यावरून दुष्काळाबाबत विरोधक किती गंभीर आहेत हे दिसून आले.

सात एप्रिल रोजी प्रशांत बंब, अर्जुन खोतकर, अतुल सावे, डॉ. जयप्रकाश मुंदडा, सुधाकर भालेराव, सुभाष साबणे, संभाजी पाटील-निलंगेकर, ज्ञानराज चौगुले, संतोष दानवे, हेमंत पाटील, संगीता ठोंबरे, राहुल पाटील, लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, नारायण कुचे, तान्हाजी मुटकुळे यांनी नियम २९३ अन्वये मराठवाड्याच्या मागासलेपणाबाबत चर्चा उपस्थित केली होती. परंतु त्या दिवशी ही चर्चा झाली नाही. त्यामुळे सोमवारी ही चर्चा ठेवण्यात आली होती. या चर्चेबरोबरच वेळ वाचवण्यासाठी विरोधकांची दुष्काळाबाबतची चर्चाही एकत्र घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, अजित पवार, गणपतराव देशमुख, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, भास्कर जाधव नियम २९३ अन्वये दुष्काळाची चर्चा उपस्थित केली होती. या दोन्ही चर्चा एकत्र केल्यानंतर प्रशांत बंब यांनी चर्चेस सुरुवात केली. मात्र, दुष्काळावरून आग्रही असलेल्या विरोधी पक्षापैकी एकही मोठा नेता उपस्थित नव्हता. सत्ताधाऱ्यांकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह ११ सदस्य उपस्थित होते तर विरोधकांतर्फे फक्त सात सदस्य उपस्थित होते. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी औंरगाबादची समस्या मांडली.
काँग्रेस नेते सोनियांच्या सभेला
सोनिया गांधी आणि राहुल गांधी नागपूरला आले असल्याने काँग्रेसचे सर्व नेते नागपूरला गेल्याने चर्चेत भाग घेऊ शकले नाहीत, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिली. दुष्काळ आणि विदर्भ मराठवाड्यावरील या अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेत भाग घेण्यासाठी विरोधी नेते उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करीत ही चर्चा की फार्स असा प्रश्न करीत होते.
पुढे वाचा.. दुष्काळावर दीर्घकालीन, तात्पुरत्या उपाययोजनांचा समन्वय हवा