आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांविरोधात खडसेंची पेरणी सुरुच, मेट्रो कारशेडवरून वादाची चिन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो रेल्वे कारशेडकरिता 75 एकर जागा देण्यात आल्याचे अप्रत्यक्ष सुचित करून दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले आहे. पक्षात सर्वात ज्येष्ठ व अनुभवी असूनही मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत कायम मनात बाळगणा-या खडसेंनी फडणवीस यांच्यावर कुरघोडी केल्याचे मानले जात आहे. याचबरोबर भाजप पक्षात व सरकारमध्येही सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिवसेना व मनसेचा आरेमधील जमिन मेट्रो कारशेडला देण्यास कडाडून विरोध असल्याचे माहित असल्याने मुख्यमंत्र्यांना टि्वट करून याबाबतच कोणताही अंतिम निर्णय झाला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नये असा खुलासा करण्याची वेळ खडसेंनी आणली आहे. मेट्रो कारशेडसाठी मुंबईत अन्यत्र इतकी मोठी जागा कोठेही उपलब्ध नसल्याने आरेतील जागा द्यावीच लागणार आहे, यात मी काहीही खोटे बोलत नाही. ही जागा दिली जाणार आहे माझ्यासह सर्वांनाच (मुख्यमंत्री फडणवीसांना असे खडसेंना म्हणायचे होते) माहिती आहे. मला कोणाचीही भाडभीड ठेवण्याची गरज वाटत नाही असे सांगत खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा पलटवार केला आहे.
भाजपमधील दोन बड्या नेत्यांत सुसंवाद असल्याने शिवसेना व मनसे याविरोधात कडक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच खडसेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य करण्यासाठी हे वक्तव्य केल्याचे राजकीय जाणकार मानत आहेत. उद्धव ठाकरे बुधवारीच युरोप दौ-यावरून आले आहेत. भाजप व शिवसेनेतही काही मुद्यांवर वाद सुरु आहेत. त्यातच कारशेडला जागा देण्यावरून शिवसेना फडणवीसांना कोंडीत पकडू शकते. तर राज ठाकरेंनीही खडसेंच्या वक्तव्यानंतर सरकारला इशारा दिला आहे. मेट्रो 3 चे कारशेड आरे कॉलनीत करण्याला आमचा विरोध आहे आणि तो कायम राहणार आहे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.कारशेड करता पर्यायी जागा उपलब्ध असताना 'आरे' मध्येच ते उभारण्याच्या निर्णयाला आमचा ठाम विरोध आहे. कारशेडच्या जागेचा निर्णय एखाद दुसरा मंत्री घेऊ शकत नाही, त्याबाबत फक्त मुख्यमंत्रीच निर्णय घेऊ शकतात. काँग्रेस-एनसीपीची धोरण राबवायची असतील तर सत्तेवर आलातच कशाला? मग ते काय वाईट होते? तुमच्याकडून वेगळी आणि लोकहिताची धोरणं राबवली जातील, अशी अपेक्षा होती. मात्र तुमची पण मोगलाईच सुरू आहे का असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. बीपीटीची मोठी जमीन कोणकोणत्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे, याचाही निर्णय झालाय का ? असा सवाल करीत मनसेने याबाबत आपला किती तीव्र विरोध आहे हेच जणू स्पष्ट केले आहे.

खडसेंनी केली मेट्रो कारशेडच्या जागेची पाहणी-
दुग्धविकास खात्याचाही भार संभाळणारे एकनाथ खडसे यांनी बुधवारी आरे येथील मेट्रो कारशेडच्या जागेची पाहणी केली. त्याच बरोबर त्यांनी महानंद डेअरीला भेट दिली. गोरेगाव पूर्व येथील कॅटलयार्डची जागा बेस्ट बस डेपोसाठी देण्याचा निर्णय खडसेंनी यावेळी जाहीर केला. कॅटल यार्डलगत असलेल्या रेल्वे स्थानकाशेजारी रस्ता खुला होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले.
कॅटलयार्डला लागून असलेल्या रेल्वे स्थानकाच्या बाजूचा रस्ता बंद होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सात ते आठ कि. मी. चा फेरा पडत असे. आता ही जागा हस्तांतरित केल्यामुळे या ठिकाणी प्रस्तावित असलेला रस्ता तयार होण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. ही जागा बेस्टला सुपूर्द करताना अट घालण्यात आली असून पालघर येथे गुरांच्या बाजारासाठी सोयी सुविधा मुंबई महापालिकेने उभाराव्यात त्यासाठी तीन कोटी बारा लाख रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित असून उर्वरित रक्कम राज्य शासन अदा करणार आहे. यामुळे पालघर येथील गुरांचा बाजार सुसज्ज होण्यास मदत होणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.
पुढे वाचा, खडसेंचे वक्तव्य म्हणजे अफवा असल्याचे मुख्यमंत्र्यांचे टि्वट पाहा ...
बातम्या आणखी आहेत...