आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Exchange In Front For Parliament Election, Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडीत अदलाबदल नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्‍ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात हिंगोली, रायगड, रावेर, हातकणंगले या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये अदलाबदलीवरून एकमत होत नसल्यामुळे या चर्चेला आता पूर्णविराम देण्यात आला आहे. त्यामुळे सन 2009 च्या निवडणुकांप्रमाणेच या वेळीही आघाडीतील दोन्ही पक्ष आपापल्या जागा लढवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सध्या राष्‍ट्रवादीकडे असलेली हिंगोलीची जागा युवक कॉँग्रेसचे राष्‍ट्रवादी अध्यक्ष व कळनुरीचे विद्यमान आमदार राजीव सातव यांना हवी होती. त्या बदल्यात राष्‍ट्रवादीने यवतमाळची मागणी केली. अन्न व प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांना येथून उभे करून राष्‍ट्रवादीला आपल्या जागांमध्ये वाढ करायची होती. मात्र, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यवतमाळची जागा आपला मुलगा राहुल ठाकरेंना मिळावी, यासाठी अडून बसले आहेत.
रायगडची जागा काँगे्रसकडे असून त्या ठिकाणी राष्‍ट्रवादी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना उभे करण्यासाठी इच्छुक आहे. मात्र, या जागेच्या बदल्यात काँग्रेसला कोल्हापूर मतदारसंघ हवा आहे. या ठिकाणी विद्यमान अपक्ष खासदार सदाशिव मंडलिक यांना आपले चिरंजीव व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांना उभे करायचे आहे. मात्र, राष्ट्रवादीशी बंडखोरी करून म्हणून निवडून आलेल्या मंडलिक यांनी काँगे्रसमध्ये प्रवेश करताना केलेली जहरी टीका राष्‍ट्रवादी विसरलेली नाही. त्यामुळे मंडलिकांसाठी कुठल्याही परिस्थितीत कोल्हापूरची जागा न सोडण्याचा निर्णय राष्‍ट्रवादीने घेतला आहे. या ठिकाणी धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याचा शब्द राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला असल्यामुळे कोल्हापूरची जागा राष्‍ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या ताब्यातील जागा न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहत इतरांच्या जागांवर मात्र दावा केल्याने अदलाबदलीची कोंडी कायम राहिली.
दोन्ही पक्षांची ताठर भूमिका
जागा अदलाबदलीत कोल्हापूरऐवजी हातकणंगले घ्या, असे राष्‍ट्रवादीचे नेते कॉग्रेसला सांगत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे हातकणंगलेचे खासदार आहेत. त्यांच्याविरुद्धची लढत सोपी नसल्यामुळे काँगे्र्रसला ही जागा नको आहे. त्यापेक्षा हातकणंगलेच्या शेजारच्या कोल्हापूरवरून काँग्रेसला जिंकण्याची जास्त संधी वाटते. राष्‍ट्रवादीच्‍या ताब्यात असलेल्या रावेरच्या मतदारसंघाची मागणी कॉग्रेसकडून होत असून तेथून आमदार मनीष जैन उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मनीष जैन यांनी वर्षभरापासून तयारीही सुरू केली आहे. मात्र, एकूणच अदलाबदलीत कॉग्रेससकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे राष्‍ट्रवादीने आता रावेरसह कुठल्याच जागांवर अदलाबदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.