आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ban On Failing Students Till Class 8 Has Attracted Its Sharpest Criticism

पहिली ते आठवीपर्यंत पास पद्धत बंद होणार, पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पहिली ते आठवीपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना नापास न करता पास करून वरच्या वर्गात ढकलले जाण्याचा निर्णय पुढील वर्षापासून बंद होण्याची शक्यता आहे. नापास न करण्याच्या निर्णयामुळे सुमारे 60 टक्के मुलांची शैक्षणिक प्रगती खुंटल्याचे आढळून आल्याने केंद्र सरकार याचा फेरविचार करीत आहे.
पहिली ते आठवीपर्यंत सरसकट मुलांना वरच्या वर्गात ढकलण्याच्या निर्णयाचा फेरविचार करायला हवा अशी शिफारस केंद्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळा (सीएबीई)ने केंद्राकडे केली आहे. मुलांना वरच्या वर्गात ढकलल्याने मुलांचेच नुकसान होत असेल तर ही पद्धत बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. त्यामुळे यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून ही पद्धत बंद होईल हे स्पष्ट झाले आहे.
2009 साली देशात शिक्षणाचा अधिकार लागू करण्यात आला. या कायद्यांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याची शिफारस होती. त्यामुळे मागील चार-पाच वर्षापासून सरसकट मुलांना पास केले जात होते. मात्र, या पद्धतीत अनेक दोष आढळून येऊ लागल्याने त्याबाबत फेरविचार करण्याची शिफारस उच्चस्तरीय शिक्षण अधिकार मंडळाने केली आहे.
या मंडळाने याबाबत काही निष्कर्ष सरकारकडे दिले आहेत. नव्या पद्धतीमुळे तिसरी व पाचवीच्या मुलांना पहिलीचे पुस्तकही वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब आढळून आली. आठवीला आल्यानंतरही अनेक मुलांना काहीच येत नसल्याचे दिसून आले आहे. तरीही मुलांना वरच्या वर्गात ढकलले जात होते. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरला. देशपातळीवरील दहावीच्या विद्यार्थ्यांचा दर्जा घसरल्याचे दिसून आले. त्यामुळे मुलांना वरच्या वर्गात ढकलण्याच्या पद्धतीला 20 राज्यांनी विरोध केला आहे.
हरयाणाच्या शिक्षणमंत्री गीता बुक्कल यांच्या नेतृत्वाखाली एक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात सर्व शाळांत पहिल्याप्रमाणे सत्र व घटक चाचणींसह वर्ग परीक्षा घेण्यात याव्यात अशी पालकांसह शाळा-शिक्षकांनी मागणी केली आहे. राज्यांची मागणी पाहता वरच्या वर्गात ढकलण्याची ही पद्धत केंद्र सरकार बंद करण्याच्या तयारीत आहे.