आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NO Fraud Done In Purchasing Of Chikki , Says Pankaja

त्यांनी केली ती खरेदी, मी केली तो घोटाळा कसा? : पंकजांचे बचावास्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चिक्की खरेदीच्या कंत्राटात कुठलाही गैरव्यवहार वा घोटाळा झालेला नाही. हा केवळ शब्दांचा घोटाळा आहे. आघाडी सरकारने ज्या केलेल्या दरसूची कराराप्रमाणेच मी खरेदी केलेली असताना त्यांनी केलेली खरेदी आणि मी केली तो घोटाळा कसा? असा सवाल करत वादग्रस्त महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असून, एक रुपयाचाही गैरव्यवहार सिद्ध झाल्यास सर्व पदांचा राजीनामा देईन, असे बचावास्त्र उगारले.

एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत केलेल्या चिक्की व अन्य साहित्य खरेदीत २०६ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पंकजांवर करण्यात आला होता. त्यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. या काळात लंडनमध्ये असलेल्या पंकजा यांनी अनेकदा खुलासे केले. मात्र, आरोपांची राळ उठतच राहिली. भारतात परतल्यानंतर बुधवारी प्रथमच पंकजा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सुमारे पाऊण तासाच्या पत्रकार परिषदेत मुंडे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोडून काढले. चिक्की खरेदीबाबतीत जे काही निर्णय घेतले ते प्रामाणिक भूमिकेतूनच घेतले होते. प्लॅस्टिक चटई, वह्या, औषध किट, स्टील ताटे या वस्तूंची खरेदीही नियमांप्रमाणे झाली, असा दावा मुंडे यांनी केला. आपण परदेशात असताना राजकीय हेतूने आरोपांची राळ उडवण्यात आली आहे. मे महिन्यातच माझ्या विभागात अनियमितता असल्याची कागदपत्रे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती. यावर त्यांनी खुलासा मागवला आणि तो आम्ही दिलाही. लाचलुचपत प्रतिबंध विभागानेही आमच्याकडून काही मुद्द्यांबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. ती आम्हाला मान्य आहे, असे मुंडे म्हणाल्या.

दरसूची करारानेही खरेदी करता येते :
२६ नोव्हेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार ३ लाख रुपयांपेक्षा जास्त खरेदी करायची असल्यास ई-टेंडरिंग पद्धत वापरायला हवी, असे असताना २०६ कोटींची खरेदी कशी केली? या प्रश्नावर ई-टेंडरिंगचा निर्णय झाला असला तरी नवीन साहित्य, वस्तूंची खरेदी दरसूची कराराप्रमाणे करू नये, असे कुठेही सांगितलेले नाही. दरसूची रद्द झालेली नाही. ती पद्धत अजूनही सुरू आहे. चिक्कीचे कंत्राट नव्याने दिलेले नाही. ते जुनेच आहे. आधीच्या सरकारच्या कराराअंतर्गतच यंदा चिक्की खरेदी केली आहे. त्यांनी तर ई-टेंडरिंग न करता तब्बल ४०८ कोटी रु.ची खरेदी केली होती; पण मी केलेल्या खरेदीला मात्र घोटाळा म्हटले जात आहे. हे साफ चुकीचे आहे, असा खुलासा मुंडे यांनी केला.

सूर्यकांता या एकाच संस्थेची दरसूची
आघाडी सरकारने पूर्वीपासूनच काही विशिष्ट कंपन्यांसाठी दरसूची करार आरक्षित करून ठेवले आहेत. माझ्यासमोर चिक्की खरेदीसाठी सूर्यकांता महिला संस्थेचा एकमेव दरसूची करार होता. चिक्की आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी मी कोणत्याही नवीन पुरवठादाराला या प्रक्रियेत सहभागी केले नाही. मी एक रुपयाचाही अपहार केला नाही, उलट उधळपट्टीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. अंगणवाडी सेविकांना थेट पोषण आहाराचे पैसे देण्याचे काम पहिल्यांदा आम्ही केले, असा दावा मुंडे यांनी केला.

मुख्यमंत्री, मंत्र्यांसह लाखो लोकांचाही पाठिंबा
तावडेंच्या पत्रपरिषदेवेळी दोन वरिष्ठ मंत्री हजर होते. तुमच्यासोबत कोणीही का नाही, या प्रश्नावर पंकजा म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री, पक्षाचे मंत्री माझ्या पाठीशी आहेत. तसेच लाखो, कोटी लोकांचाही मला पाठिंबा आहे.’ सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत आणि माझे त्यांच्याशी बोलणेही झाले आहे.

चिक्की खराब असल्यास कारवाई
चिक्कीचा दर्जा अजिबात खराब नाही. चिक्की चांगली असल्याचा अहवाल आमच्याकडे आहे. चिक्कीची प्रयोगशाळेत तपासणी झाली आहे. चिक्कीत माती तसेच काही पाकिटांची मुदत संपल्याचे म्हटले जात आहे. त्याविषयी चौकशी सुरू आहे. चिक्की खराब असल्यास कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, असे मुंडेंनी स्पष्ट केले.