आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन समारंभाला भाजपला निमंत्रण नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेने रविवारच्या सभेसाठी सोशल मिडियात जोरदार प्रचार सुरु केला आहे. - Divya Marathi
शिवसेनेने रविवारच्या सभेसाठी सोशल मिडियात जोरदार प्रचार सुरु केला आहे.
मुंबई- शिवसेना पक्षाच्या स्थापनेला येत्या रविवारी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. गेली वर्षभर शिवसेनेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवले आहेत. 50 वर्ष पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून शिवसेनेने रविवारी (19 जून) मुंबईतील गोरेगावमध्ये विशेष जाहीर सभा आयोजित केली आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे राज्यभरातील नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे विशेष भाषण करणार आहेत. आगामी काळात शिवसेनेची ध्येयधोरणे काय असतील याबाबत ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा बिगुल फोडला जाणार आहे. त्यामुळेच शिवसेनेने सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनाला भाजपला निमंत्रण न देण्याचे ठरविले आहे. 25 वर्षे एकमेंकांसोबत राहिलेल्या भाजप-शिवसेनेची आगामी काळात मार्ग वेगवेगळेच राहणार हे यातून स्पष्ट होत आहे.
मुंबईतील मराठी माणसांना न्याय मिळावा म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. पुढे मराठी माणसांवर होणा-या अन्यायाविरोधात आवाज उठवून महाराष्ट्रात पसरलेल्या शिवसेनेने 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे सूत्र अवलंबले. मात्र, 1990 नंतर शिवसेनेने सत्तेच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेने भाजपला सोबत घेतले. 90 च्या दशकात महाराष्ट्रात शिवसेना मोठी तर भाजप लहान पक्ष होता. मात्र, राष्ट्रीय पक्ष असल्याने मागील एक-दोन दशकात भाजप महाराष्ट्रासह देशात वेगाने वाढत गेला. मात्र, शिवसेनेने भाजपसोबत युती केल्याने बाळासाहेबांनी युतीचे म्हणून राजकारण केले. हिंदुत्त्वाच्या मुद्यांवर हे दोन्ही पक्ष लढले व वाढले. मात्र काळ बदलत गेला तसे पक्षाची ध्येयधोरणे व नेतेही बदलत गेले. 2014 सालच्या लोकसभेत भाजपला जोरदार यश मिळाल्यानंतर भाजपने 25 वर्षाची अभेद्य युती तोडली. यामुळे उद्धव ठाकरेंना धक्का बसला. ज्यांच्यासोबत आपण राहिलो त्यांनीच ऐन मोक्याच्या वेळी दगा दिल्याने उद्धव दुखावले.
विधानसभेत दोन्ही पक्ष वेगळे लढले. भाजपने बाजी मारली पण बहुमतापासून ते दूरच राहिले. अखेर भाजपने शिवसेनेला दुय्यम स्थान देत सत्तेत सहभागी करून घेतले. मात्र, पक्षातील नेत्यांत दरी वाढत गेली. त्यानंतर औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली आदी महानगरपालिका निवडणूकाही या पक्षांनी वेगवेगळ्या लढवल्या व पुन्हा सत्तेसाठी एकत्र आले. आता मुंबईसह राज्यातील 20 प्रमुख महानगरपालिकेच्या निवडणुका सहा महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. भाजपने स्वबळावर लढण्यासाठी शड्डू ठोकला आहे तसेच शिवसेनेला वेगवेगळ्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई महापालिकेत भाजप सत्तेत असूनही वेगवेगळ्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत शिवसेनेला लक्ष्य करीत आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांत दरी वाढत चालली आहे.
शिवसेनाही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करीत आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवत भाजपला शह देण्याचा उद्धव ठाकरेंनी चंग बांधला आहे. त्यासाठीच शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाचा समारंभ जोरात साजरा केला जाणार आहे. येत्या रविवारी गोरेगावमध्ये उद्धव यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या समारंभाला शिवसेनेने भाजपला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गोरेगावमध्ये साज-या होणा-या शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला भाजपच्या एकाही नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच प्रकाशझोतात राहवेत, यासाठी शिवसेनेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)