आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Lok Sabha Candidates List Of Nationalist Congress, Only Discussion

राष्ट्रवादीचा बार फुसका; लोकसभेच्या उमेदवारांची यादी नाहीच, फक्त चर्चा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर करणार असल्याचे छातीठोकपणे सांगणार्‍या राष्ट्रवादीचा बार फुसका ठरला. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर चर्चा, बैठका झाल्या खर्‍या; पण नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माढा, बीड, कल्याण, शिरूर, दिंडोरी, जळगाव, रावेर व बुलडाणा या जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अजित पवार, छगन भुजबळ, आर.आर. पाटील या मंत्र्यांसह खासदार, आमदार, निरीक्षक उपस्थित होते. माढामधून विजयसिंह मोहिते पाटलांचे नाव जवळपास निश्चित आहे. याशिवाय संजय शिंदे, रामराजे निंबाळकर यांच्याही मुलाखती झाल्या. बुलडाण्याचे राजेंद्र शिंगणे, रेखा खेडेकर यांच्यात स्पर्धा असल्याचे समजते. पण दोघांचीही मते जाणून घेण्यात आली.
बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांची उमेदवारी पक्षाने ठरवली आहे, पण सुरेश धस यांचेही मत विचारात घेतले गेले. कल्याणमधून आनंद परांजपे हे नाव नक्की असल्याचे सांगितले गेले, पण गणेश नाईक, वसंत डावखरे, हिंदुराव पाटील, जितेंद्र आव्हाड यांची मतेही घेतली गेली. या ठिकाणी आव्हाडही इच्छुक असल्याचे समजते. त्यांच्या पत्नी कळवा-मुंब्य्रातून आव्हाडांच्या जागी आमदारकी लढवणार असल्याचेही बोलले जात होते. पण परांजपेंच्या नावाला पसंती मिळाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचा यातून काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीच्या 13 जानेवारीच्या बैठकीत 22 पैकी 19 जागांवरील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली. त्याच नावांवर या बैठकीत मोहर उठवण्यात आली. हातकणंगले, रायगड, नगर या तीन जागांवर अद्याप कुठलाही उमेदवार जाहीर न करण्याचे राष्ट्रवादीने ठरवले आहे.
राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार
1 माढा : विजयसिंह मोहिते पाटील 1 बारामती : सुप्रिया सुळे 1 बीड : जयदत्त क्षीरसागर 1 हिंगोली : सूर्यकांता पाटील 1 परभणी : विजय भांबळे 1 उस्मानाबाद : पद्मसिंह पाटील 1 नाशिक : छगन भुजबळ 1 बुलडाणा : राजेंद्र शिंगणे 1 जळगाव : सतीश पाटील 1 उत्तर-पूर्व मुंबई : संजय पाटील 1 दिंडोरी : ए.टी.पवार, 1 सातारा : उदयनराजे भोसले 1 मावळ : लक्ष्मण जगताप 1 शिरूर : वल्लभ बेनके 1 भंडारा : प्रफुल पटेल 1 ठाणे : संजीव नाईक 1 कल्याण : आनंद परांजपे 1 रावेर : रवींद्र पाटील 1 कोल्हापूर : मुन्ना महाडिक 1 अमरावती : दिनेश बूब.
राज्यसभेसाठी उमेदवार आज; आदिक, फौजिया खान स्पर्धेत
राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून बुधवारी उमेदवार जाहीर करण्यात येतील. एका जागेसाठी शरद पवारांचे नाव आहे. दुसर्‍या जागेसाठी गोविंदराव आदिक, फौजिया खान, माजिद मेनन ही नावे चर्चेत आहेत.