मुंबई- महायुतीत मनसेला सामावून घेण्याचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. याबाबत भाजपच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी मनसेचा विषय संपलेला आहे असे सांगितले आहे. सध्याची महायुती भक्कम आहे यासाठी आणखी पक्षांची गरज नाही. नितीन गडकरींसह भाजपचे सर्व नेते आणि आम्ही लवकरच एकत्र बसू, असे उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.
राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीने शिवसेना अस्वस्थ झाल्याचे सांगण्यात येते तसेच याबाबत बातम्या आल्या आहेत. याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना छेडले असता त्यांनी महायुतीत सर्व ठीकठाक असल्याचे सांगितले. महायुतीत पाच पक्ष असून, सर्व जागांचे व्यवस्थित वाटप झाले आहे. दोन-तीन जागांवरील उमेदवार घोषित करण्याचे राहिले आहे. काही धोरणात्मक कारणांमुळे या जागा घोषित केल्या नाहीत. मात्र एक-दोन दिवसात किंवा आज सायंकाळपर्यंत कधीही ते उमेदवार जाहीर करू शकतो. त्यामुळे नव्या पक्षांना महायुतीत घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. तसेच महायुती भक्कम असून, आणखी कोणाचीही मुळीच गरज नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.