आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूटोणाविरोधी विधेयकात खटकावे असे काहीही नाही, उध्‍दव ठाकरेंचा विधेयकास पाठिंबा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘जादूटोणाविरोधी विधेयकात खटकावे असे कोणतेही कलम नाही. त्यामुळे या विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा राहील,’ अशी ठाम ग्वाही शिवसेना पक्षप्रुमख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिली. शिवसेनेने गेली 18 वर्षे या विधेयकाला विरोध केला, मात्र आता डॉ. दाभोलकरांच्या पश्चात उपरती आलेल्या उद्धव यांनी मूळ भूमिकेपासून घूमजाव केले आहे.

कांदिवली येथील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. जादूटोणाविरोधी विधेयकात आता धर्म किंवा र्शद्धेविरोधी कलम नाही. त्यामुळे ते मंजूर व्हायला हवे. या विधेयकाला विरोध करणार्‍या वारकर्‍यांची मी स्वत: समजूत घालीन. गेली 18 वर्षे जादूटोणाविरोधी विधेयक रखडल्याबद्दल उद्धव यांनी खेद व्यक्त केला; परंतु यातील तरतुदींचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी विधेयकात बदल आवश्यकच होते, अशी सारवासारवही त्यांनी केली.

हे विधेयक केवळ हिंदू धर्मीयांना लागू नाही, तर सर्वच धर्मांतील अघोरी प्रथांना लागू आहे, असे सांगत या विधेयकाचे उद्धव ठाकरे यांनी उघडपणे सर्मथनच केले. वारकरी विधेयकाला असणारा विरोध मागे घेतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 2005 मध्ये युती शासनाच्या काळात अंधर्शद्धाविरोधी विधेयक पहिल्यांदा विधानसभेत सादर झाले, मात्र शिवसेना आणि भाजप सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे विधेयक 18 वर्षे लटकले होते. शिवसेनेने आता त्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपची भूमिका काय असेल, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वीच या कायद्याचे सर्मथन केले आहे.